शरद पवार गटाकडून पक्षाची नावे देण्यात येणार आहेत. पक्षाच्या चिन्हासाठीचे पर्याय दिले जाणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार गटाने दिलेली ही नावे २७ फेब्रुवारीपर्यंत वैध राहणार आहेत. पक्षाच्या तीन नावांच्या पर्यायापैकी एक नाव निवडणूक आयोग निश्चित करणार आहे.
काय असणार नाव?
शरद पवार गटाने आज दुपारी तीन वाजेपर्यंत पक्षाचे नाव द्यायचे आहे. नावासाठी तीन पर्याय शरद पवार गटाने निश्चित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यानंतर शरद पवार गटाच्या पक्षाचे नाव काय असेल? त्यासाठी शरद पवार गटाकडून तीन पर्याय ठरवण्यात आले आहेत. त्यात शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार स्वाभिमानी पक्ष हे पर्याय देण्यात आले आहेत.
advertisement
शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी खलबतं सुरू झाली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी आदिती नलावडे आणि वकील दाखल झाले आहेत. सुप्रीम कोर्टात शरद पवार यांच्यावतीने निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावाबद्दल पत्र देण्यात येणार आहे.
अजित पवार गटाचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर आज लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयात राष्ट्रवादी काँग्रेस पत्र देणार आहे. आज दुपारी पत्र देण्याची शक्यता आहे. लोकसभेत ओम बिर्ला यांना सुनील तटकरे यांच्यावतीने पत्र देण्यात येणार आहे. या पत्रात केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा उल्लेख केला जाणार आहे. अजित पवार यांच्या गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी या पत्रात केली जाणार आहे.
