शरद पवारांवरील टीकेमुळे राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या टीकेच्या पातळीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बुधवारी, सांगलीतील जतमध्ये भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या निवडणूक प्रचार सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका करताना त्यांच्या व्याधींवर भाष्य केले. या वक्तव्यानंतर सदाभाऊ खोत यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे.
फडणवीसांचा याला पाठिंबा आहे का?
advertisement
सांगलीत पत्रकारांशी बोलताना जयंत पाटीलने म्हटले की, सदाभाऊ खोत यांचे वक्तव्य हे दुर्देवी आहे. भाजपने स्तर किती खाली नेला याचे द्योतक आहे. भाजपने अशी वक्तव्ये करणारे डॉग स्कॉड बाळगले आहेत. देवेंद्र फडणवीस याचे समर्थन आहे का याचा त्यांनी खुलासा करावा अशी मागणीदेखील जयंत पाटील यांनी केली. सदाभाऊंच्या वक्तव्यांवर महाराष्ट्रातील जनता भाजपला प्रायश्चित घेण्यास भाग पाडेल असेही त्यांनी म्हटले. भाजप मधील काही लोक शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका करतात आणि आमदारकी मिळवत असतील तर भाजपच्या विचार त्यांना लखलाभ असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
अजित पवारही नाराज, सुनावले खडे बोल...
अजित पवार यांनी म्हटले की, मी तीव्र शब्दात खोत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्याच ट्विट ही केलं आहे. त्यांना फोन करूनही सांगितले आहे. तुम्ही केलेले हे स्टेटमेंट आम्हाला कुणालाही आवडले नाही, तुम्ही हे बंद करा वैयक्तिक कुणाच्या विषयी बोलणं आपल्याच पद्धत नाही, त्याबद्दल मी फोनवरच सदाभाऊंचा निषेध केला असल्याचे अजित पवारांनी सांगितले. हा निंदनीय प्रकार असून विनाशकाली विपरीत बुद्धी सारखा प्रकार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. असली वक्तव्ये महाराष्ट्र खपवून घेत नसल्याचेही अजित पवारांनी म्हटले.