सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मोठी घडामोड झाली आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांच्या पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला आहे. या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या संजयमामा शिंदे यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. तर विद्यमान आमदार नारायण पाटील भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटातून विजयी झाले आहेत. या निवडणूक निकालानंतर आमदार नारायण पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.
advertisement
रोहित पवारांवर टीकास्त्र...
सर्व 21 जागांवर यश मिळवत करमाळ्यातील स्थानिक जनतेने आपली ताकद दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे विजयी उमेदवार आणि आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली. “संजय मामा शिंदे यांचा प्रचार करूनही जनतेने आमच्यावर विश्वास ठेवत संपूर्ण विजय दिला. रोहित पवार हे आमच्याच पक्षाचे असूनही त्यांनी शिंदे यांना जाहीरपणे पाठिंबा दिला, हे अपेक्षित नव्हतं. मात्र, जनतेने त्यांच्या भूमिकेवर आपला न्याय दिला आहे,” अशी टीका पाटील यांनी केली.
पक्षाकडे तक्रार करणार नाही....
आमदार नारायण पाटील यांनी पुढे म्हटले की, साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमच्याच पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी उघडपणे आमच्या विरोधकांचा म्हणजे अजित पवार गटाचे संजय मामा शिंदे यांचा प्रचार केला. त्यांना कळायला हवे होते. पुढे त्यांनी म्हटले की, आता आम्ही सर्व जागा जिंकल्या असून या विजयात रोहित पवार यांच्याविरोधात पक्षाकडे किंवा शरद पवारांकडे कोणतीही तक्रार करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.
नारायण आबा पाटलांच्या पॅनलची एकहाती सत्ता...
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 21 संचालक मंडळाच्या जागेसाठी 62 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर शरद पवार गटाची एकहाती सत्ता आली आहे. तर, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या महायुतीच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. कारखान्याच्या निवडणुकीतील 21 पैकी 21 जागांवर विजय मिळविल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून करमाळा तालुक्यात जल्लोष करण्यात आला. संजयमामा शिंदे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, त्यांनाही अपयशाला सामोरे जावे लागले.