कोल्हापूर : राज्यात नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान आता संपलं आहे. नगरपरिषदेचा निकाल आता २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये कोण जिंकणार यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. कोल्हापूरमध्ये तर शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी चक्क एक लाखांची पैज लावण्याचा प्रकार समोर आला आहे. पैज लावण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान पार पडलं. मात्र, न्यायालयाच्या आदेशामुळे निकाल जाहीर होण्यासाठी २१ डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. निकालाला अजून बरेच दिवस आहेत. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये कोणता नेता जिंकणार याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये गल्लीबोळात निवडणुकीच्या निकालावर पैजा लावल्या जात आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड येथे तब्बल एक लाख रुपयांची थेट पैज लागल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये दोन जणांची एक लाख रुपयांची पैज लावली असून याचा पुरावा म्हणून व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये जर राष्ट्रवादीच्या दोन जागा आल्या तर एक जण एक लााख रुपये देईल. आणि जर भाजप-शिवसेनेच्या दोन्ही जागा आल्या तर समोरील व्यक्ती १ लाख रुपये रोख देईल, अशी ही पैज लागली आहे. एका मंदिरासमोर ही पैज लावली असून सर्वांसमोर ही पैज मंजूरही करण्यात आली आहे.
कोल्हापूरमध्ये पैज लावण्याचा प्रकार नवीन नाही. याआधीही काही कार्यकर्त्यांनी तर शपथपत्रावर लिहून पैज लावल्याचे प्रकार समोर आले होते. आता नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकतो की भाजप-शिवसेनाचा उमेदवार जिंकतो, या निकालावरच एक जण आता लाख रुपये जिंकणार आहे.
