कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा संगमनेरमधील वसंत लॉन्स येथे संपन्न झाला. अतिशय थाटामाटात झालेल्या सोहळ्याला राजकीय सामाजिक, वारकरी सांप्रदायातले अनेक जण उपस्थित होते. समाज माध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या चित्रफितींमधून ज्ञानेश्वरीचा साखरपुडा अतिशय शानदार झाल्याचे दिसून येते.
इंदुरीकरांचा जावई कोण, काय करतो?
निवृत्ती महाराज देशमुख यांचे जावई साहिल चिलाप हे व्यावसायिक क्षेत्रात आहे. त्यांचे मूळ गाव जुन्नर तालुक्यातील येणेरे असून सध्या ते व्यवसायानिमित्त नवी मुंबईत स्थायिक झाले आहेत. जुन्नरला त्यांची बागायती शेती आहे. शेतीत अनेक उत्तमोत्तम प्रयोग त्यांनी केले आहेत. शेतीबरोबरच स्वतःचा यशस्वी व्यवसाय देखील त्यांनी उभा केला आहे. नवी मुंबईत बांधकाम क्षेत्रात त्यांनी आपला जम बसवला आहे. तसेच ट्रान्सपोर्ट व्यवसायातही त्यांच्या मालकीची अनेक वाहने आहेत.
advertisement
इंदुरीकर महाराजांचे कीर्तनातून प्रबोधन
कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे मूळचे अहमदनगरचे आत्ताचे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरचे. आपल्या परखड वाणीने समाजातील वाईट रुढी परंपरा, व्यसनाधीनता आणि अंधश्रद्धेवर ते कडाडून प्रहार करतात. अनेक वेळी त्यांच्या विधानांवरून समाजात गजहब निर्माण होतो. अनेकदा त्यांच्या वक्तव्यांवरून जोरदार वादही निर्माण होतात. युवा वर्गाला गुन्हेगारी विषयी वाटणारे आकर्षण, युवकांचा राजकारणातला रस, शेतीविषयी कमी झालेली आस, व्यसनाधीनता, मुलांच्या लग्नानंतर आई वडिलांची होणारी परवड, आदी प्रश्नांवर इंदुरीकर महाराज नेहमीच परखडपणे भाष्य करतात.
