नाशिक : राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सदनिका घोटाळा प्रकरणात कोकाटे यांच्याविरोधात अखेर अटक वॉरंट जारी करण्यात आली आहे. अटक वॉरंट विरोधात माणिकराव कोकाटे यांच्या वकिलाने कोर्टात धाव घेतली होती. कोकाटे यांना सरेंडरसाठी काही दिवसांची मुदत द्यावी अशी मागणी करण्यात आली.
advertisement
आज सकाळपासून माणिकराव कोकाटे चर्चेत आले होते. माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार होती. माणिकराव कोकाटे हे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार होते, अशी माहिती समोर आली होती. मात्र, अचानकपणे माणिकराव कोकाटे हे नॉट रिचेबल असल्याने चर्चांना उधाण आले.
माणिकराव कोकाटे कुठं? वकिलाने कोर्टात सांगितलं....
अटक वॉरंट जारी करण्यात येऊ नये, कोर्टासमोर शरण येण्यासाठी काही दिवसांचा कालावधी मिळावा यासाठी कोकाटे यांच्या वकिलाने कोर्टात धाव घेतली होती. अॅड. मनोज पिंगळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावतीने युक्तिवाद केला. अटक वॉरंट टाळण्यासाठी युक्तिवाद करण्यात आला होता. माणिकराव कोकाटे हे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. माणुसकीच्या दृष्टीने त्यांना सरेंडर करण्यासाठी ४ दिवसांचा वेळ द्यावा अशी मागणी वकिलांनी केली होती. माणिकराव कोकाटे हे शासकीय रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती त्यांनी कोर्टाला दिली. मात्र, कोर्टाने ही विनंती फेटाळून लावताना कोकाटे यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले.
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे हे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. माणिकराव कोकाटे हे आजारी असल्याने त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली.
मंत्रिमंडळातून गच्छंती होणार?
दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळातून आता माणिकराव कोकाटे यांची गच्छंती होण्याची शक्यता बळावली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकाळी भेट घेतली होती. या भेटीत फडणवीसांनी कोकाटे यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचे संकेत दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सदनिका घोटाळा प्रकरणात सुनावण्यात आलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने 16 नोव्हेंबर रोजी याबाबतचा निकाल दिला होता. त्यानंतर आता कोकाटे यांना आमदारकी गमवावी लागण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुका आणि माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजितदादांना थेट विचारणा केल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सुमारे ३० वर्षांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी नाशिक शहरात अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. त्यांनी स्वतःसह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या. तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी हे प्रकरण समोर आल्यानंतर सरकारकडून तक्रार देण्यात आली होती, जिल्हा प्रशासनानेही चौकशी केली होती.
या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. मंगळवारी (दि. १७) जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटेंची दोन वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. तसेच न्यायालयाने त्यांच्या अटकेचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
