लातूर - शेतीत योग्य नियोजन आणि शेती करण्याची आवड असली की शेतीतून चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळवता येते, हे एका डॉक्टरने दाखवून दिले आहे. ते पपईची यशस्वी शेती करुन आठवड्याला दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. आज याच डॉक्टर शेतकऱ्याची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
डॉ. सुधीर कानडे (BAMS) हे जनरल फिजिशियन आहेत. तसेच ते लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार शिरशी येथील रहिवासी असून कासार शिरशी येथेच त्यांचा खासगी दवाखाना आहे. आपल्या डॉक्टरी पेशासोबतच ते अत्याधुनिक शेती करत आहेत. तसेच अत्याधुनिक शेतीच्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळवत आहेत.
advertisement
सुधीर कानडे यांच्यातील शेती करण्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. वैद्यकीय व्यवसायाची चांगली भरभराट चालू झाल्यानंतर त्यांनी शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. गेल्यावर्षी त्यांनी 5 एकर पपईची लागवड केली आहे. यामध्ये जुलै महिन्यापासून आठवड्याला दीड ते 2 लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे.
ते आठवड्याला 7 ते 8 टन पपईची विक्री करतात. तर त्यांना प्रति किलो 22 रुपयांहून अधिकचा बाजार भाव मिळतो आहे. त्यामुळे पपईच्या शेतीतून डॉ. सुधीर कानडे हे चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत.
लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, नक्कीच युवा शेतकऱ्यांनी अत्याधुनिक शेती केलीच पाहिजे. मी डॉक्टर असूनही शेती करू शकतो तर तुम्हीही शेती करून चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकतात, असा संदेशही त्यांनी युवा शेतकऱ्यांना दिला आहे.