लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शनिशिंगणापूर येथील शनीदेवाचे मंदिर प्रशासन भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत आलं होतं. बनावट एपच्या माध्यमातून भाविकांची लूट, बेसुमार बोगस कामगार भरती, भ्रष्टाचार एक ना अनेक कारणामुळे शनी मंदिर विश्वस्त वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यामुळे एकीकडे या प्रकरणांची चौकशी सुरू असताना राज्य सरकारच्या विधी न्याय विभागाने विश्वस्त मंडळ बरखास्त करत कारवाई केली होती.
advertisement
त्यानंतर आता शनी मंदिर संस्थानचा कारभार हा जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्पुरता सोपवला आहे. आज (शनिवारी) जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी शनीदेवाचे पूजन करत आपला पदभार स्विकारला आहे. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पंकज आशिया यांना सर्वांनी सहकार्य करावे, असं आवाहन केलंय.
काय आहे प्रकरण?
दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने शनी शिंगणापूर येथील प्रसिद्ध शनैश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करण्याचा मोठा निर्णय घेतला. देवस्थान प्रशासनातील अनियमितता, भ्रष्टाचार, बनावट ॲप आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारित असलेले शनी शिंगणापूर देवस्थान राज्य सरकारने ताब्यात घेतले आहे. गेल्या काही महिन्यांपासून विश्वस्त मंडळावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे विधी न्याय विभागाने देवस्थान अधिनियम 2018 नुसार विश्वस्त मंडळ बरखास्त केली आहे. या निर्णयाचे शनी शिंगणापूर ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळाच्या कारभारा विरोधात लढा देणारांनी स्वागत केलंय.