अनंत गर्जे आणि डॉ. गौरी यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. नवीन संसाराची स्वप्ने पाहत असतानाच हा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 7 फेब्रुवारी रोजी या जोडप्याने लग्नगाठ बांधली होती. मात्र, वरळीमध्ये डॉ गौरी गर्जे यांनी स्वत:ला संपवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध होते. त्यावरून गर्जे दाम्पत्यांमध्ये वाद, भांडण सुरू होती. यातून डॉ. गौरी यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गौरीच्या कुटुंबीयांनी तिचा पती अनंत याच्याशिवाय, त्याचा भाऊ, बहीण यांचीही तक्रार दाखल केली आहे.
advertisement
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर मध्ये काय? वाचा शब्द न् शब्द...
गौरी गर्जे हिच्या वडिलांनी अनंत गर्जे आणि त्यांचा भाऊ, बहिणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, मुलगी गौरी ही मुंबईमध्ये रहावयास होती त्यावेळी ती मला व माझी पत्नी अलकनंदा हिचेशी फोनवर बोलत असे त्यावेळी ती मला व माझी पत्नी हिला सांगत असे की, अनंत हा तिच्या घरगुती किरकोळ कारणावरुन सतत वाद घालत असे. त्यावेळी मी व माझी पत्नी तिला समजविण्याचा प्रयत्न करत असे की, त्यांना कामाचा त्रास होत असेल त्यामुळे वाद होत असतील.तिने मोबाईलवरून माझ्या मोबाईल क्रमांकवर व्हॉट्सअँपद्वारे काही फोटो पाठवले. दिनांक 30/09/2025 रोजी संध्याकाळी 07.00 वाजण्याच्या सुमारास माझी मुलगी गौरी हिने तिच्या ते फोटो मी पाहिले असता, त्यामध्ये दिनांक 16/11/2021 रोजीचे ममता हॉस्पिटल, लातूर येथील गर्भवती स्त्रीचे संमतीपत्र आणि जाहीरनामा असल्याचे दिसले. त्यामध्ये श्रीमती किरण सिध्दार्थ इंगळे असे महिलेचे नाव असून तिच्या पतीचे नाव अनंत भगवान गर्जे असे नमुद होते. त्या कागदपत्रावरुन अनंत याचे किरण या महिलेशी काहीतरी संबंध असल्याचे मला वाटले म्हणून मी तात्काळ गौरीला फोनद्वारे संपर्क करून तिला सदर कागदपत्राबाबत विचारले असता गौरीने सदरचे कागदपत्र हे तिला घर शिफ्ट करतांना मिळून आल्याचे रडत सांगत होती. तेव्हा तिला आम्ही तुझ्याकडे येतो तू रडू नकोस शांत बस असे सांगितले, तेव्हा तिने मला आपण येऊ नका, आपण आलात तर अनंत हा तिला तिचे नाव चिठ्ठीत लिहुन आत्महत्या करीन अशी धमकी देत आहे असे सांगितले. तसेच तिने मला अनंत व किरण सिध्दार्थ इंगळे यांच्या अफेयर बाबत माझा दीर अजय, नणंद शीतल राजेंद्र आंधळे यांना यापूर्वी माहित होते व तिने त्याबदल नणंद शीतल सोबत अनंतच्या अफेयर बाबत बोलले होते, परंतु नणंद शीतल हिने तिला तुझे अनंत सोबत जमले नाही तर मी माझ्या भावाचे दुसरे लग्न लावीन अशी धमकी देत असल्याचे सांगितले. त्यानंतर माझी पत्नी अलकनंदा हिने गौरी हिची नणंद शीतल यांना फोन करून सदरबाबत विचारले असता, शीतल हिने आम्ही आमचं बघून घेवू म्हणत फोन ठेवला.
दिनांक 03/10/2025 रोजी माझा जावई अनंत याचा वाढदिवस असल्याने मी व माझी पत्नी गौरीकडे मुंबईला जाणार होतो. पण गौरीने आम्हाला फोनवरून कळविले की, तुम्ही माझ्याकडे मुंबईला येवू नका असे रडत रडत सांगत होती. तरी सुद्ध आम्हाला तिची काळजी वाटत असल्याने अनंत याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौरीला कोणतीही पूर्व कल्पना न देता दिनांक 03/10/2025 रोजी सकाळी 06.30 वाजण्याच्या सुमारास मी व माझी पत्नी असे गौरी हिच्या मुंबई येथील वरळी येथील रुमवर आलो होतो. त्यावेळी ती आम्हाला म्हणाली की, तुम्ही कशाला घरी आलात, अनंत माझ्यावर रागावतील असे म्हणत होती. तेव्हा मी तिला अनंतच्या अफेयर बाबत त्याच्याशी कोणतीही चर्चा करणार नाही असे सांगितले होते. तेव्हा ती शांत झाली. त्यावेळी आम्हाला गौरी हिचे चेहऱ्यावर व गळ्यावर मारल्याचे व्रण दिसले. तेव्हा मी व माझे पत्नीने गौरी हिला त्या जखमांबाबत विचारणा केली असता, गौरी हिने आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली. यांनतर तिच्याकडे आम्ही अधिकची चौकशी केली असता तिने आम्हाला सांगितले की, तिचा दीर अजय याने याआधीच तिला अनंतच्या आणि किरण सिध्दार्थ इंगळे हिचेसोबत असलेल्या अफेयर बाबत सांगितले होते, परंतु ते तिने मनावर घेतले नव्हते. पण गौरी हि नविन घरी शिफ्ट करत असताना तिला किरण हिचे प्रेग्नंट असल्याचे कागदपत्र सापडले होते. त्या कागदपत्रामध्ये तिचा पती म्हणून अनंत याचे नाव नमुद होते, त्यामुळे ती नाराज होती.
सदरबाबत तिने अनंत यास विचारले असता त्याने तुला काय करायचे ते कररामी कोणाला घाबरत नाही, जर तू याबददल कोणाला सांगितले तर तुझे नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करीन अशी धमकी दिली होती. त्यानंतर आम्ही संध्याकाळी जावई अनंतचा वाढदिवस साजरा करून रात्री 08.00 वाजण्याच्या सुमारास परत बीडला निघुन गेलो,
दि 21/11/2025 रोजी जावई अनंत याने रात्री 10.15 वाजता माझे मोबाईलवर दोन मिसकॉल आले होते. परंतु मी बाथरूमला गेलो असल्याने कॉल उचलू शकलो नाही. त्यानंतर मी जावई अनंत यांना फोन केला असता अनंत यांनी फोन उचलला नाही म्हणून मी गौरीला फोन करून विचारपूस केली असता तिने सर्व ठीक असल्याचे सांगितले. काल दिनांक 22/11/2025 रोजी संध्याकाळी 6.45 या सुमारास जावई अनंत याने गला फोन करून कळविले की, मामा गौरी सुसाइड करायला लागली तिला समजावा, मी अनंतला गौरीकडे फोन देण्यास सांगिताले असता त्यांनी गौरीला फोन न देता गौरीला दवाखान्यात घेवून जात असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने लगेचच माझे पत्नीला कॉल करून मामी माझे समोर गौरीचे प्रेत आहे असे सांगून फोन ठेवला त्यानंतर मी व माझी पत्नी सदरवेळी एकत्रच असल्याने आम्ही अनंतला पुन्हा कॉल केला. परंतु त्याने कॉलला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आम्ही आमचे मुंबई येथे राहणारे मामेभाऊ कारभारी खेडकर या नातेवाईकांना सदरची हकीकत सांगून गौरीच्या घरी जावून माहिती घेण्यास सांगितले असता रात्री 8.00 वा दरम्यान त्यानी आम्हाला कॉल करून करून गौरी मयत झाली असून तिला सध्या नायर रुग्णालय येथे ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही मुंबईला येवून नायर रुग्णालय येथे गेलो असता अनंतने गौरीने आत्महत्या केल्याचे सांगितले.
तरी माझी मुलगी नामे गौरी हीस तिचा पती अनंत गर्जे याने लग्न झाल्यानंतर काहि कालावधीतच किरकोळ कारणावरून वाद घालण्यास तसेच किरण सिध्दार्थ इंगळे या महिलेसोबत असलेले अफेरबाबत गौरी हिरा समजल्याने तिस मानसिक व शारिरिक त्रास देण्यास सुरुवात केली व जर तिने तिचे माहेरच्या लोकांना याबाबत काही सांगितले तर स्वतःचे जीवाचे काहीतरी बरेवाईट करेल अशी धमकी देवुन तिला ब्लॅकमेल करून त्रास देत असे. तसेच अनंत गर्जे यांची बहिण शीतल राजेंद्र आंधळे हि देखील गौरी हिस जर तुझे अनंत याचेशी जमत नसेल तर त्याचे दुसरे लग्न लावून देऊ अशी धमकी देत असे.
त्यानंतर दिनांक 22/11/2025 रोजी अनंत भगवान गर्जे यांनी मला फोन करून सांगितले की, गौरी हीने आत्महत्या केली आहे. म्हणुन माझी मुलगी गौरी हिच्या मृत्युस तिचा पती अनंत भगवान गर्जे, बहीण शीतल भगवान गर्जे-आंधळे, दीर अजय भगवान गर्जे हे जबाबदार असून जावई अनंत गर्जे हा गौरी हिने आत्महत्या केल्याचे सांगत असला तरी त्यामध्ये खरेच आत्महत्या आहे की काही घातपात आहे? याबाबत माझी मुलगी गौरी हिंचे आत्महत्येचा कायदेशीर तपास होवून सत्य समोर येणेबाबत तपास होऊन मला न्याय मिळावा म्हणून वरील तीन लोकांविरूध्द माझी कायदेशीर तक्रार आहे, असे गौरीच्या वडिलांनी म्हटले.
