सतीश भोसले उर्फ खोक्या हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. खोक्या भाईचे मारहाण करताना, गुंडगिरी करताना काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. पोलीस मागावर असल्याने खोक्या भाई पसार झाला होता. मात्र, त्याने माध्यमांना मुलाखत देत आपल्यावरील सगळे आरोप फेटाळून लावले. माध्यमांना सापडणारा खोक्या पोलिसांना न सापडल्याने बीड पोलिसांवर टीका सुरू झाली होती. अखेर खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली.
advertisement
या दरम्यान, वनविभागाने खोक्याचे घर वन विभागाच्या जमिनीवर असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला. अखेर, त्यानंतर काही अज्ञातांनी त्याच्या घरातील वस्तूंना आग लावली. त्याशिवाय काही महिलांना मारहाण झाल्याचाही आरोप करण्यात आला होता. या कारवाईच्या विरोधात खोक्याची पत्नी उपोषणावर बसली आहे.
पारधी समाजाचे आक्रमक रास्ता रोको आंदोलन
सतीश भोसले यांना केवळ पारधी समाजातील असल्याने अन्यायकारकपणे अडकवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या कुटुंबाने गेल्या अनेक दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले असून, प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. तसेच, त्यांच्या मोडलेल्या घराची नुकसानभरपाई द्यावी आणि राजकीय नेत्यांच्या संघर्षात पारधी समाजाच्या कार्यकर्त्यांना बळी पडू दिले जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. हे आंदोलन केवळ तुळजापुरापुरते मर्यादित राहणार नसून संपूर्ण महाराष्ट्रभर पारधी समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. समाजाच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.