पार्थ पवार यांच्या मालकीच्या ‘अमेडिया एलएलपी’ कंपनीवर दुसऱ्या जमीन घोटाळ्याचा गुन्हा दाखल झाला आहे. महसूल विभागाच्या तक्रारीनंतर खडक पोलिसांनी तहसीलदारासह अमेडिया एलएलपीवर आणखी एक गुन्हा नोंदवला आहे. मुंढवा येथील जमीन प्रकरणानंतर या कंपनीचा हा दुसरा जमीन गैरव्यवहार असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या डेअरी विभागाच्या मालकीची जमीन खासगी व्यक्तीच्या नावावर चढवून सरकारी संपत्तीचा अपहार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रक्रियेत भूमी अभिलेख बदलण्यात गंभीर अनियमितता झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शासकीय जमिनीचे बेकायदेशीर खरेदी-विक्री झाल्याचे समोर आले आहे.
advertisement
मुंढवातील जमीन प्रकरणात संबंधित तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, पुढील तपासात या जमिनीची खरेदी पार्थ पवार यांच्या अमेडिया एलएलपी मार्फत करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता कंपनीवरही फसवणूक आणि सरकारी जमिनीच्या गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडक पोलिसांनी गुन्हा नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आधीच मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात आधीच वाद सुरू असताना, अमेडिया एलएलपीवर दुसरा गुन्हा नोंदवला गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुंढव्यातील जमीन व्यवहार प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी यामध्ये पार्थ पवारांचे नाव नसल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पार्थ पवार अमेडिया कंपनीचे संचालक असून त्यांची सर्वाधिक भागीदारी आहे. असे असतानाही त्यांना सोडून इतरांवर गुन्हा दाखल झाल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
