पुण्यातील वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पूत्र पार्थ पवारांच्या कंपनीने केलेला जमीन व्यवहार वादात सापडला होता. पार्थ पवारांच्या कंपनीने १८०० कोटींची जमीन ३०० कोटीत खरेदी केली होती आणि २१ कोटींची स्टॅम्प ड्युटी न भरता फक्त 500 रुपये भरले होते.. यावरुन राज्यात राजकारण तापल्यानंतर हा व्यवहार अखेर रद्द करण्यात आलाय. याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून ही समिती संपूर्ण चौकशी करेल, त्या चौकशीत सर्व घटनाक्रम पुढे येईल. कोणी मदत केली, कुणाचे फोन गेले हे सगळं समोर येईल. असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच पार्थ पवारांनी व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. विक्रीपत्र रद्द करण्यासाठीचे आवश्यक दस्तावेज वकीलामार्फत दाखल करण्यात आल्याची अजित पवारांच्या कार्यालयाने माहिती दिली आहे.
advertisement
नेमकं काय म्हटलंय त्या अर्जात?
गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये माझा मुलगा पार्थ पवार संचालक असलेल्या एका कंपनीच्या जमीन व्यवहारासंदर्भात काही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. काल मी सांगितले होते की या प्रकरणाविषयी संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच मी याबाबत सविस्तरपणे बोलणार आहे. त्यानुसार मी संबंधित अधिकाऱ्यांशी तसेच पार्थशी सविस्तर चर्चा करून सर्व तथ्ये जाणून घेतली आहेत.
मी हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की या व्यवहारात ना मी, ना माझे कार्यालय कोणत्याही टप्प्यावर सहभागी झालेले नाही. कोणताही फोन, मदत किंवा हस्तक्षेप झालेला नाही. उपलब्ध माहितीनुसार हा फक्त जमीन खरेदीचा प्राथमिक करार आहे. पार्थ, त्याची कंपनी ‘अमेडिया’ किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून विक्रेत्यास कोणतेही पैसे देण्यात आलेले नाहीत, तसेच जमिनीचा ताबा घेतलेला नाही. त्यामुळे हा व्यवहार अपूर्ण अवस्थेत आहे.
पार्थच्या मते, प्रस्तावित व्यवहार कायदेशीर चौकटीत आणि पूर्ण पारदर्शकतेने पार पाडला गेला होता. मात्र, सार्वजनिक जीवनात आरोपांचा संशय देखील आपल्यावर होऊ नये, हे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे काही गैरकृतीचे आरोप केल्यामुळे पार्थने तो करार रद्द करण्याचा निर्णय घेतला असून विक्रीपत्र रद्द करण्याचे आवश्यक दस्तऐवज नोंदणी कार्यालयात सादर केले गेले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यासाठी सरकारने चौकशी समिती नियुक्त केली आहे. कोणाकडे काही ठोस माहिती किंवा पुरावे असल्यास त्यांनी ते समितीसमोर सादर करावेत. चौकशीच्या या प्रक्रियेतून सत्य उघडकीस येईल आणि कोणीही दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
मी आजवर सदैव कायदा आणि नियमांच्या चौकटीत राहून काम केले आहे. माझे प्रत्येक निर्णय हे न्याय, सत्य आणि वैधतेच्या मुल्यांवर आधारित असतात. हीच मुल्ये माझ्या कुटुंबीयांनाही लागू आहेत.
