शेख शरीफ शेख नुरा असं अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव असून ते परतूरमधील न्यू नंदनवन कॉलनीत राहायला होते. मिळालेल्या माहितीनुसार, शेख शरीफ हे परतूर येथे राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राच्या दशक्रिया विधीसाठी आपल्या स्कूटीने जात होते. ते वाटूर-परतूर रोडवरून रोहीणा पाटीजवळून प्रवास करत असताना, एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, शेख शरीफ गंभीर जखमी झाले.
advertisement
अपघात होताच, अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी जखमी शेख शरीफ यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेने शेख शरीफ यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत शेख शरीफ यांची मुलगी शेख निलोफार एजान यांनी परतूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परतूर पोलीस या अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहेत. मित्राच्या दहाव्याला जाणाऱ्या व्यक्तीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
