भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शुक्रवारी फोडला. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रविंद्र चव्हाण यांनी थेट अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला.
अजित पवार यांना सत्तेत सोबत घेतल्याचा पश्चाताप होतोय
अजित पवार यांना सोबत घेताना विचार करा, असे खासगीत देवेंद्र फडणवीस यांना सांगायचो. प्रदेशाचा अध्यक्ष असल्याने पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्ते पदाधिकारी माझ्याकडे तक्रारी करत असतात. त्यांना सत्तेत सोबत घेतल्याचा पश्चाताप होतो, रोज पश्चाताप होतो, असे वक्तव्य रविंद्र चव्हाण यांनी केले. त्यांच्या वक्तव्याने आगामी काळातील दोन्ही पक्षातील वादविवाद टोकाला जाणार असल्याचे संकेत मिळताहेत.
advertisement
भाजपकडून महेश लांडगे यांना ताकद
प्रदेशाध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांनी महानगर पालिका निवडणुकीसाठी महेश लांडगे यांना विशेष करून ताकद दिली आहे. पैलवानाच्या नादाला लागायचं नसतं, असा इशारा अजित पवार यांना देत तुमची लढाई महेश लांडगे यांच्यासोबत असल्याचेच अप्रत्यक्षपणे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
तुम्ही मोदी-फडणवीसांच्या भाजपबद्दल बोलताय हे लक्षात ठेवा, अपने गिरेबाँन में झाँक के देखिए
इथे येऊन भाषण करून, पत्रकार परिषदा घेऊन काही लोक दिलाभूल करण्याचा प्रयत्न करतात. परंतु अजित पवार 'अपने गिरेबाँन में झाँक के देखिए' अशी खरमरीत टीका चव्हाण यांनी केली. अजित पवार यांनी काय प्रकारचे आरोप प्रत्यारोप करायचे हे त्यांनी ठरवले पाहिजे. तुम्ही मोदी-फडणवीसांच्या भाजपबद्दल बोलताय हे लक्षात ठेवा. आम्ही आरोप करायला गेलो तर त्यांना खूप अडचणी येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
ज्यांनी ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्यांच्यासोबतच मी सत्तेत बसलोय
दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या सत्ता काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकळला. महापालिकेच्या ४ हजार कोटींच्या ठेवी २ हजारांवर कशा आल्या? त्या पैशांतून नेमकी कुठली विकासकामे केली, हे त्यांनी दाखवावे, असे आव्हान अजित पवार यांनी भाजपला दिले. तसेच ज्यांनी माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्यांच्यासोबतच मी सत्तेत बसलोय, गुन्हा सिद्ध होण्याआधी कुणीच गुन्हेगार नसतो, असे सांगत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजपलाच आरसा दाखवला.
