नागपूर : आपल्या दैनंदिन वापरात सहज उपलब्ध असणारे प्लास्टिक आता आपल्या शरीरात आणि मेंदूपर्यंतही पोहचले आहे. दररोजचा होणारा प्लास्टिकचा वापर आता मनुष्यासाठी जीवघेणा ठरत असून मानवी मेंदूत प्लास्टिकचा शिरकाव झाल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. मानवी मेंदूत प्लास्टिकचा प्रवेश झाल्याने मेंदूशी संबंधित डिमेन्शिया,अल्झायमर्स,स्मृतिभ्रंश यासारखे आजार होण्याचा धोका वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.
advertisement
तुम्ही- आम्ही सगळे दररोज प्लास्टिकच्या वस्तू वापरतो,प्लास्टिकच्या साधनांमधून पाणी पितो,अन्नपदार्थ खातो मात्र,आता हेच प्लास्टिक आपल्या शरीरात प्रवेश करत आहे. मायक्रो किंवा नॅनो प्लास्टिकच्या स्वरूपात प्लास्टिक शरीरात प्रवेश करून जेवघेणे ठरत आहे.जागतिक दर्जाच्या 'नेचर' या जर्नलमध्ये मानवी मेंदूत प्लास्टिकचा शिरकाव झाल्याचे संशोधन छापून आलंय. मानवी मेंदूत प्लास्टिकचा प्रवेश झाल्याने मेंदूशी संबंधित डिमेन्शिया,अल्झायमर्स,स्मृतिभ्रंश यासारखे आजार होण्याचा धोका कैकपटीने वाढतो आहे.
कसा होतो प्लास्टिकचा शरीरात प्रवेश?
- मानवी शरीरात प्रवेश करणारे प्लास्टिकचा आकार एक नॅनोमिटर पेक्षा कमी असतो
- डोळ्यांना ते दिसत नाही
- हे नॅनो प्लास्टिक जमीन,पाणी आणि वातावरणातून शरीरात प्रवेश करतात
- भाज्या आणि फळांच्या सेवणातून प्लास्टिक शरीरात जातं
- प्लास्टिकच्या कप,ग्लासचा वापर
- समुद्राच्या पाण्यात 24 लाख ट्रीलियन मायक्रो प्लास्टिक असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे
- समुद्रातील मासे यांच्या माध्यमातून मानवी शरीरात प्लास्टिकचा प्रवेशाचा धोका आहे
2016 आणि 2024 मध्ये मृत झालेल्यांच्या मेंदूचा अभ्यास करण्यात आला.यात 2016 च्या तुलनेत 2024 मध्ये मृत झालेल्यांच्या मेंदूत प्लास्टिकचे प्रमाण 50 टक्के अधिक आढळले.
अमेरिकेच्या संशोधनातून काय समोर आले?
एक लिटरच्या प्लास्टिक बॉटल मधून वर्षभरात 2 लाख 40 हजार मायक्रो प्लास्टिक शरीरात जातं. अमेरिकेत झालेल्या संशोधनात मिठाच्या 39 ब्रँड पैकी 36 ब्रँडमध्ये मायक्रो प्लास्टिक आढळून आलं. मेंदूमध्ये मायक्रो प्लास्टिक जमा झाल्यास पक्षाघात होण्याचा धोका अधिक असतो. दैनंदिन जीवनातून प्लास्टिकचा वापर कसा कमी करता येईल यासाठी सरकारसोबत सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्यास डॉ. चंद्रशेखर मेश्राम सांगतात.
आजच्या घडीला प्लास्टिक मुक्त जीवन शक्य आहे का हे आताच सांगणे कठीण आहे. मात्र प्लास्टिकचा कमीत कमी वापर करून जनजागृती करणे आवश्यक आहे.प्लास्टिकच्या वापरावर आळा घालणं ही केवळ पर्यावरणापुरती मर्यादित नाही तर आता ती आरोग्याची गरज बनली आहे.