राज्यात नगर पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसंदर्भात प्रदीप गारटकर प्रचंड आशावादी होते. परंतु राष्ट्रवादी भरतशेठ शहा यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने गारटकर यांनी टोकाचा निर्णय घेत पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे जाहीर केले आहे.
अल्टिमेटमनंतरही राष्ट्रवादीने ठेंगा दाखवला
पक्ष जर आम्हाला कोलणार असेल तर आम्हीही पक्षाला कोलू, असे विधान प्रदीप गारटकर यांनी केले होते. आपल्या वक्तव्यानंतर पक्ष संधी देईल, अशी आशा त्यांना होती. मात्र त्यांच्या वक्तव्यानंतरही पक्षाने भरतशेठ शहा यांना उमेदवारी दिल्याने गारटकर यांनी मनगटावरील घड्याळ उतरवण्याचे ठरवले आहे. सोमवारी गारटकर नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत.
advertisement
राजीनामा देऊन नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार
पक्ष मला संधी देईल, असे मला वाटत होते. परंतु पक्षाने ज्यांचा प्रवेशही झाला नाही, अशांना संधी देण्याचे ठरवले आहे. कार्यकर्त्यांसाठी लढणाऱ्या व्यक्तीला पक्षाने डावलले आहे. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार असल्याचे गारटकर यांनी सांगितले.
अजित पवार यांना मोठा धक्का
प्रदीप गारटकर यांची ओळख अजित पवार यांचे अतिशय विश्वासू सहकारी अशी आहे. पुणे ग्रामीणचा भार प्रदीप गारटकर यांच्या खांद्यावर आहे. अजित पवार यांच्या गृह जिल्ह्यातील अनुपस्थितीत गारटकर हे संपूर्ण जबाबदारी सांभाळतात. मात्र तेच राष्ट्रवादीशी फारकत घेत असल्याने अजित पवार यांना निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.
