नागपुरातील वंचित बहुजन आघाडीत (VBA) पुन्हा एकदा अंतर्गत मतभेद उघडकीस आले आहेत. पक्षाचे पूर्व विदर्भ संयोजक रवी शेंडे यांनी थेट नागपूर जिल्हा प्रभारी कुशल मेश्राम यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनामा दिला आहे.
रवी शेंडे यांनी म्हटले की, मेश्राम यांनी विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित पक्षांकडून आर्थिक व्यवहार करून "मर्जीतील उमेदवार" उभे केले. यामुळे वंचित बहुजन आघाडीचा जनाधार तळाला गेला आणि एकाही उमेदवाराला 3 हजारांपेक्षा अधिक मते मिळवता आली नाहीत.
advertisement
शेंडे हे वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून पक्षाशी जोडलेले होते. यापूर्वी ते नागपूर शहर अध्यक्ष म्हणून बऱ्याच वर्षे कार्यरत होते. मात्र, सध्याच्या घडामोडींमुळे त्यांनी संयोजक पदासोबतच पक्षातील जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
वंचितला धक्का...
पक्षाने शेंडे यांचा राजीनामा मंजूर केला असून, त्याचबरोबर नागपूर शहरातील चार विधानसभा मतदारसंघांचे अध्यक्षदेखील पद सोडून बाहेर पडले आहेत. त्यामुळे पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक ताकदीवर मोठा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
राजकीय वर्तुळात ही घटना गंभीर मानली जात असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीत सुरू झालेली ही फूट भाजप, काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी फायद्याची ठरू शकते, अशी चर्चा रंगू लागली आहे.