नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाला होता. आरोपी शिक्षक अमीर खान याने एका १३ वर्षीय विद्यार्थ्याला एका मुलीपर्यंत मेसेज पोहोचवण्यास सांगितलं होतं. मात्र, त्या विद्यार्थ्याने तो मेसेज मुलीला दिला नाही. याचा राग मनात धरून अमीर खानने त्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली होती.
या घटनेनंतर, ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी शाळा भरत असताना अमीर खानने इयत्ता ७ वी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला. इतकेच नाही तर, "याबाबत कोणालाही काही सांगू नकोस," अशी धमकी त्याने दिली. आरोपीच्या धमकीनंतर घाबरलेल्या मुलीनं कुणाला काहीच सांगितलं नाही. यामुळे आरोपीची हिंमत आणखी वाढली. तो सातत्याने तिचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देऊ लागला.
advertisement
पालकांनी दाखवले धाडस
पीडित मुलगी या प्रकारामुळे प्रचंड दहशतीखाली होती. मात्र, धीर एकवटून तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. आपल्या मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकून पालकांनी तत्काळ सानपाडा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सानपाडा पोलिसांनी तातडीने आरोपी अमीर खान याला अटक केली आहे.
त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS)कलम ७५ आणि ७८ आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. हा प्रकार समोर आल्यानंतर पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास सुरू केला असून, शाळेतील इतर कोणा विद्यार्थ्याला असा त्रास झाला आहे का? याचाही शोध घेतला जात आहे.
