हा प्रकार पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मरकळ येथील लोखंडे कुटुंबात घडला आहे. पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, विमानतळ पोलिसांनी पती आदित्य अनिल लोखंडे (वय २८), सासरे अनिल किसन लोखंडे (वय ५३), सासू सुवर्णा अनिल लोखंडे (वय ४८) आणि नणंद समृद्धी अनिल लोखंडे (वय २५) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि आरोपी आदित्य यांचा विवाह २२ ऑगस्ट २०२३ रोजी अत्यंत शाही थाटात पार पडला होता. वधूच्या वडिलांनी आपल्या लेकीला सासरी त्रास होऊ नये म्हणून लग्नात सढळ हाताने खर्च केला होता. यामध्ये तब्बल ५५ तोळे सोने, २ किलो चांदीची भांडी, घरातील महागड्या इलेक्ट्रिक वस्तू आणि 'फॉर्च्युनर' गाडी असा जवळपास २ कोटी रुपयांचा ऐवज हुंडा म्हणून दिला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यात सासरच्यांनी आपले खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली.
advertisement
पतीच्या वाढदिवसाला मागितलं सोन्याचं कडं
लग्नानंतर काही दिवसातच पती आदित्यचा वाढदिवस होता. याचं निमित्त साधून सासरच्यांनी माहेरून पैसे आणि दागिने आणण्यासाठी विवाहितेचा छळ सुरू केला. आदित्यला वाढदिवसाला सोन्याचं कडं हवं म्हणून त्यांनी तगादा लावला. मुलीचा त्रास कमी व्हावा म्हणून वडिलांनी देखील आपल्या जावयाला ४ तोळ्याचं सोन्याचं कडं, २५ हजारांचं घड्याळ आणि वाढदिवसाच्या खर्चासाठी ३५ हजार रुपये रोकड दिली. मात्र, तरी देखील आणखी पैसे घेऊन ये असे म्हणत सासरच्यांनी तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरूच ठेवला.
धक्कादायक बाब म्हणजे तरुणीचा एकीकडे हुंड्यासाठी छळ सुरू असताना सासऱ्याने नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार केला आहे. सासऱ्याने विनयभंग केल्याचा आरोप तरुणीने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
