मिळालेल्या माहितीनुसार, भोर येथील २३ वर्षीय तक्रारदार व्यावसायिक आहेत. त्यांनी १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीसाठी २०० ब्रास माती वाहतुकीचा कायदेशीर परवाना घेतला होता आणि त्यासाठी शासनाकडे नियमानुसार १ लाख २६ हजार २३० रुपये रॉयल्टी जमा केली होती. परवान्यानुसार त्यांची माती वाहतूक सुरू असताना, ३० नोव्हेंबर रोजी मंडळाधिकारी रूपाली गायकवाड यांनी त्यांच्या गाड्या अडवल्या आणि माती वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यासाठी लाचेची मागणी केली.
advertisement
पैसे न दिल्याने गाड्या अडवल्या
तक्रारदाराने लाच देण्यास नकार दिल्याने मंडळाधिकारी गायकवाड यांनी त्यांच्या मातीच्या गाड्या जाणूनबुजून अडवून ठेवल्या. पैसे दिल्याशिवाय वाहतूक करू दिली जाणार नाही, असे सांगत त्यांना वारंवार कार्यालयात चकरा मारण्यास भाग पाडले. या त्रासाला कंटाळून अखेर संबंधित व्यावसायिकाने ३ डिसेंबर रोजी पुणे एसीबीकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली.
एसीबीने तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन पडताळणी केली. पडताळणीत मंडळाधिकारी गायकवाड यांनी तक्रारदाराकडे पुन्हा एकदा १ लाख रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी गायकवाड यांनी तक्रारदाराला भोर शहराबाहेरील अभिजीत मंगल कार्यालयाजवळ भेटण्यास बोलावले.
एसीबीने रचला सापळा
ठरल्याप्रमाणे, एसीबीच्या पथकाने भोरेश्वर नगर रस्त्यावर सापळा रचला. तक्रारदाराने १ लाख रुपयांची लाच मंडळाधिकारी रूपाली गायकवाड यांच्याकडे सोपवताच, त्यांनी ती स्वीकारली. त्याच क्षणी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष त्यांना रंगेहाथ पकडले आणि तातडीने अटक केली.
