राजमाची उद्यानाजवळ हातावरचे पोट असलेली, दिवसभर पेरू विकून उदरनिर्वाह करणाऱ्या भाग्यश्री जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लोणावळा नगरपरिषदेची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. आमदार सुनिल शेळके यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे सर्वसामान्य महिलांच्या संघर्षाला नव्या आशेचे पंख मिळाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून जगताप कुटुंबाचं उदरनिर्वाह फळ विक्रीच्या व्यवसायावर अवलंबून आहे. अशा प्रसंगी त्यांना व्यवसाय सांभाळत प्रचाराची धुरा ही सांभाळावी लागतीय. त्यामुळं भाग्यश्री दिवसा फळ विक्री करता-करता ही प्रचार करतायेत अन सायंकाळी घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत ही पोहचतायेत. ना मोठे बॅनर, ना मोठा ताफा… फक्त प्रामाणिकपणा, कामाची निष्ठा आणि लोकांचा विश्वास इतकंच त्यांचं भांडवल आहे. याच भांडवलावर भाग्यश्री जगताप निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
advertisement
राजकारणाच्या बाजारात तिकीट मिळवण्यापासून ते मतं मिळवण्यापर्यंत काय-काय करावं लागतं, हे उघड्या डोळ्याने आपण सर्वजण पाहतोय. अशात फळ विक्रेत्या भाग्यश्री स्वतःचं नशीब अजमवतायेत.तर खंडाळा बोरघाट आदिवासी माथ्यावरील बॅटरी हिल परिसरातील आदिवासींच्या पट्ट्यात भाग्यश्री जगताप यांचे जंगी स्वागत होत असून पैशांपेक्षा माणुसकी मोठी असते अन त्याचं माणुसकीच्या जोरावर मी नगरसेविका होणार, असं प्रांजळ मत त्या व्यक्त करतायेत. आता मतदार त्यांची साद ऐकून मतांचे दान भाग्यश्री जगतापांच्या पारड्यात टाकणार का हे निकालाच्या दिनी स्पष्ट होईल.
