"आता प्रत्येक ध्येय गाठायचं, प्रत्येक पाऊल जनतेसाठी टाकायचं, महापौर साहेब... मा. गणेशभाऊ बिडकर यांची पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवक पदी दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन", असा मजकूर लिहिलेले बॅनर पुणे शहरात लावण्यात आले आहेत. या बॅनरवर महापौर साहेब असा उल्लेख केल्याने पुण्यात भाजपला बहुमत मिळालं तर बिडकर महापौर असतील, असा दावाच या बॅनरमधील केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
बिडकर विरूद्ध धंगेकर, हायव्होल्टेज लढत
खरं तर, पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत सगळ्यात हाय प्रोफाईल लढत म्हणून गणेश बिडकर यांच्याकडे पाहिलं जात होतं. प्रभाग क्रमांक २४ मधून भाजपनं त्यांना उमेदवारी दिली होती. तर शिवसेना शिंदे गटाकडून इथं माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे पूत्र प्रणव धंगेकर यांना तिकीट दिलं होतं. बिडकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. त्यामुळे इथं या दोन्ही बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अशात महानगर पालिका निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच अशाप्रकारे बॅनर लागल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवत होते. स्वत: अजित पवार पुणे जिल्ह्यात ठाण मांडून बसले होते. त्यामुळे इथं खरंच भाजपला बहुमत मिळेल का? आणि मिळालं तर महापौर कोण असतील? हे येत्या काही वेळातचं स्पष्ट होणार आहे.
