२९ महानगरपालिका निवडणुकांमध्ये पुण्यातील प्रभाग क्रमांक ४० हा राज्यभरातील एकमेव प्रभाग ठरला, जिथे सर्व उमेदवार महिला होत्या. विशेष बाब म्हणजे सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातील जागेसाठीही भाजपने महिला उमेदवाराला उमेदवारी दिली होती. भाजपच्या या धाडसी निर्णयावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, मात्र निकालाने पक्षाचा निर्णय योग्य ठरवला आहे.
प्रभाग क्रमांक ४० मधून अर्चना अमित जगताप, वृषाली सुनील कामठे, पूजा तुषार कदम आणि रंजना पुंडलिक टिळेकर या चारही महिला उमेदवारांनी विजय मिळवत महिलाराज अधोरेखित केले. प्रचाराच्या काळात या चारही उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला, स्थानिक प्रश्न मांडले आणि विकास करण्याचा विश्वास मतदारांना दिला.
advertisement
राज्यात आणि देशात नव्याने महिला आरक्षणाची चर्चा सुरू असताना पुण्यातील या निकालाची सर्वत्र चर्चा आहे. महिला केवळ आरक्षित जागांपुरत्याच मर्यादित नसून सर्वसाधारण प्रवर्गातही त्या सक्षमपणे निवडणूक जिंकू शकतात, हे या निकालाने अधोरेखित केले आहे. विशेष म्हणजे पुण्यात भारतीय जनता पक्षाने पुरूषांच्या तुलनेत महिलांना अधिक उमेदवारी दिली होती. भाजपचा हा प्रयोग यशस्वी ठरल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
दरम्यान, हा विजय केवळ आमचा नसून प्रभागातील प्रत्येक महिलेचा आहे. विकास, सुरक्षितता आणि पारदर्शक कारभार हाच आमचा अजेंडा असेल, अशा भावना विजयी उमेदवारांनी व्यक्त केली.
