बाणेर रस्त्यावरील आलिशान बंगल्यात दोन तास थरार
मिळालेल्या माहितीनुसार, बाणेर येथील नॅशनल सोसायटी परिसरात पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यासह राहतात. शनिवारी (१० जानेवारी) रात्री पूजा खेडकर घराबाहेर होत्या. रात्री साडेअकराच्या सुमारास जेव्हा त्या बंगल्यात आल्या, तेव्हा त्यांचे आई-वडील झोपलेले होते. पूजा यांनी त्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शुद्धीत नव्हते.
advertisement
त्याच वेळी बंगल्यात लपून बसलेल्या ३ ते ४ जणांनी पूजा खेडकर यांच्यावर हल्ला केला. दरोडेखोरांनी त्यांचे हातपाय चिकटपट्टीने बांधून त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले. १० दिवसांपूर्वीच कामावर ठेवलेल्या नेपाळी स्वयंपाक्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने बेडरुममधील कपाटातून सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या.
गुंगीचे औषध देऊन लूट
प्राथमिक तपासानुसार, दरोडेखोरांनी दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर आणि घरातील एका नोकराला अन्नातून किंवा अन्य कशातून तरी गुंगीचे औषध दिलं होतं, जेणेकरून ते बेशुद्ध पडतील. ज्यावेळी हा प्रकार घडत होता. तेव्हा पूजा खेडकर घरात नव्हत्या. त्या रात्री साडेअकराच्या सुमारास घरी आल्या. यावेळी आई वडील झोपलेले दिसले. त्यांनी दोघांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण ते दोघंही निपचित पडलेले होते. दोघं गाढ झोपलेत की बेशुद्ध आहेत, हे कळायच्या आत बंगल्यात लपलेल्या तीन ते चार जणांनी अचानक पूजावर हल्ला केला.
सर्वांनी पूजाला घट्ट पकडलं. तिचे हातपाय चिकटपट्टीने बांधले आणि एका खोलीत डांबून ठेवलं. यानंतर आरोपींनी पूजा खेडकर यांच्या बेडमधील कपाटातून मौल्यवान ऐवज आणि घरातील सर्वांचे मोबाईल घेऊन पळ काढला. मध्यरात्री दीडच्या सुमारास पूजा खेडकर यांनी स्वतःची कशीबशी सुटका केली आणि तातडीने चतुःश्रृंगी पोलिसांना फोन करून माहिती दिली.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी बेशुद्धावस्थेतील तिघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलीस आता या नेपाळी कामगाराचा आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.
