इमारतीच्या बांधकाम पूर्णत्व दाखल्यासाठी तक्रारदाराने प्रांताधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. यासाठी शिंदे यांनी २ लाखांची लाच मागितली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने शुक्रवारी मंचर येथील प्रांत कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताना प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना ताब्यात घेतले. मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
advertisement
प्रांताधिकाऱ्यांनी २ लाखांची लाच मागितली
तक्रारदार हे बांधकाम व्यवसायिक असून ते एका भागीदारी फर्मचे एक भागीदार आहेत. नमूद बांधकाम फर्मने इमारत बांधण्यासाठीच्या लागणाऱ्या सर्व शासकीय विभागाच्या परवानग्या ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठीचे, इमारत पूर्ण झाल्यावर पूर्णत्व प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचे तसेच त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे शासकीय शुल्क भरणा करण्याचे सर्व अधिकार तक्रारदार यांना दिलेले आहेत. सदर भागीदारी फर्मने पुणे-नाशिक महामार्ग लगत नारायणगाव येथे Joint Venture मध्ये विकासासाठी घेतलेल्या प्लॉटवर इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. सदर इमारतीचे 90 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदाराने अंशतः पूर्णत्वाचा दाखला मिळण्याकरता उपविभागीय अधिकारी जुन्नर-आंबेगाव यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर तो प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांनी नगर रचना विभागाकडे पाठवून त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून स्वतःकडे प्रस्ताव राखून ठेवला होता.
२० मार्च २०२६ रोजी सदर प्रस्तावाबाबत तक्रारदार हे चौकशी करण्यासाठी गेले असता उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी तक्रारदाराने बांधलेल्या इमारतीसाठी अंशतः पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्याकरिता तक्रारदाराकडे पाच लाख रुपयाच्या लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी २४ मार्च रोजी अँटी करप्शन ब्युरो पुणे येथे दिली होती.
अन् प्रांताधिकाऱ्यांना रंगेहात पकडलं
तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २७ मार्च रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता पडताळणीदरम्यान नमूद आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे अर्जाप्रमाणे त्यांनी बांधलेल्या इमारतीस अंशतः पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मंजुर करून त्या मोबदल्यात तक्रारदाराकडे २ लाख रुपयाची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
पडताळणी कारवाई झाल्यानंतर २७ मार्च रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाईदरम्यान आलोसे गोविंद पंढरीनाथ शिंदे, उपविभागीय अधिकारी, जुन्नर-आंबेगाव यांना उपविभागीय कार्यालय मंचर या त्यांच्या शासकीय कार्यालयात तीन वाजून तीन वाजता तक्रारदार यांचेकडून २ लाख रुपये लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात पकडण्यात आले. आरोपी लोकसेवक यांच्याविरुद्ध मंचर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण पोलीस येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
