पुणे: वाहतूक कोंडी सहन करणाऱ्या पुणेकरांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुणेकरांना वाहतुकीच्या कोंडीच्या कटकटीतून दिलासा देण्यासाठी लवकरच आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे. शहरातील तब्बल 500 सिग्नल जंक्शनवर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (ITMS) उभारण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 1100 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची कामे पुढील तीन महिन्यांत सुरू होणार आहेत.
advertisement
नव्या प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम करण्यात येणार आहे. गाड्यांचा वेग, वाहनांची संख्या, प्रवासाचा कालावधी आणि पीक अवरमधील ट्रॅफिकचा सखोल अभ्यास या प्रणालीकडून होईल. त्यानुसार सिग्नल आपोआप समायोजित केले जातील. त्यामुळे सिग्नलवर होणारी अनावश्यक गर्दी टळेल आणि वाहतूक अधिक सुरळीतपणे सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, एआयच्या मदतीने सिग्नल सिंक्रोनायझेशन साधले जाणार आहे. यामुळे एका रस्त्यावरून दुसऱ्यावर जाताना वाहनांना सलग हिरवा सिग्नल मिळू शकतो. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल. नागरिकांना सर्वाधिक त्रास देणाऱ्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्यावेळी निर्माण होणारी वाहतूक कोंडीही या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
याशिवाय, रुग्णवाहिकांसाठी ग्रीन कॉरिडॉर त्वरित उपलब्ध करून देण्याची सुविधा या सिस्टीममुळे मिळणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्यास मदत होईल.
पुण्यातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहन संख्येमुळे नागरिक वाहतुकीच्या समस्येने त्रस्त आहेत. अशा पार्श्वभूमीवर 1100 कोटींच्या खर्चाचा हा प्रकल्प शहराच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
102 कोटींचा प्रकल्प पाण्यात?
स्मार्ट सिटी अंतर्गत पुण्यात अडेंटिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ATMS) सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली होती. महापालिकेने 102 कोटी खर्च करून 125 सिग्नल्स बसवले होते. मात्र, एवढा खर्च करूनही पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहिला. त्यामुळे आता आधीचे 102 कोटी रुपये पाण्यात गेल्याची चर्चा असताना आता 1100 कोटींचा प्रकल्प यशस्वी होईल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.