नेमकी घटना काय आहे?
शफिया सलीम शेख (वय ४०) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शफिया या देहविक्रीचा व्यवसाय करत होत्या. ८ फेब्रुवारी रोजी रात्री ती कोंढवा भागातील कान्हा चौकात मद्यधुंद अवस्थेत उभी होती. यावेळी आरोपी केशव कमलेश चौधरी (२०), सोन्या लक्ष्मण पवार (१८) आणि अब्दुल मोहम्मद शेख (२३) यांनी तिला पाहिले. या तिघांनी शफियाला कात्रज येथील एका लॉजवर न्यायचं ठरवलं, मात्र तिथे न नेता त्यांना मांगडेवाडी येथील एका निर्जन डोंगरावर नेले.
advertisement
काही वेळातच त्यांचे इतर तीन साथीदार महादेव अर्जुन व्होरडे (४०), साई अमित पुजारी (१९) आणि सोहेल हनीफ खान (२०) हे देखील तिथे पोहोचले. डोंगरावर सर्व आरोपी शफियासोबत मद्यपान करत होते. यावेळी शफिया यांनी "मला लॉजवर न नेता इथे डोंगरावर का आणले?" असा जाब विचारला. याच कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. रागाच्या भरात सहाही आरोपींनी शफिया यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत शफिया यांचा जागीच मृत्यू झाला. घाबरलेल्या आरोपींनी आपला गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह जवळच असलेल्या ५० ते ५५ फूट खोल खाणीत फेकून दिला आणि तिथून पळ काढला.
पोलिसांचा तपास आणि अटक
१० फेब्रुवारी रोजी मांगडेवाडी येथील खाणीत एका महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. भारती विद्यापीठ पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला.
पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण
या घटनेबाबत शहरात विविध चर्चा सुरू होत्या, मात्र पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, "ही सामूहिक बलात्काराची घटना नाही. प्राथमिक तपासात आणि आरोपींच्या चौकशीत हा केवळ खुनाचा गुन्हा असल्याचे समोर आले आहे. देहविक्री करणारी महिला आरोपींसोबत गेली होती आणि तिथे झालेल्या वादातून हा खून झाला आहे. सहाही आरोपी आमच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे."
