१७ वर्षीय अल्पवयीन मुलावर चार अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. पुण्यातील माणिकबाग भागात सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बर्गर किंग दुकानासमोर दोन दुचाकींवरून आलेल्या चार तरुणांनी तोंडाला रूमाल बांधून तरुणावर हल्ला चढवला.
मुलगा रक्ताच्या थारोळ्यात, टोळक्याच्या दहशतीने सर्वसामान्य नागरिक भीतीच्या छायेत
हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करत मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंहगड रस्त्यावर टोळक्याच्या दहशतीने सर्वसामान्य नागरिक भीतीच्या छायेत आहेत.
advertisement
मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू, पोलिसांकडून गुन्हा दाखल
जखमी अल्पवयीन मुलाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कळते आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक
पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अलीकडच्या काळात विविध घटनांमुळे चर्चेत आहेत. कधी कोयता गँगकडून हल्ल्यावर हल्ले, कधी अंतर्गत टोळीयुद्ध, कधी वाहनांची तोडफोड आदी घटनांमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. पुणे पोलीस गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी जंग जंग पछाडतायेत. मात्र गुन्हेगारीचा पूर्ण बिमोड करण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.
