राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. मुदत संपण्याच्या अवघ्या काही तास आधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथमधील कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश देत अधिकृतपणे निवडणूक लढवण्यास मनाई केली होती. मनसेची अधिकृत उमेदवारी कोणालाही दिली जाणार नाही. इच्छुकांनी अपक्ष म्हणून लढायचे किंवा आपापल्या राजकीय गणितांनुसार निर्णय घ्यायचा, अशी मुभा देण्यात आली होती. त्यानंतर अंबरनाथमध्ये मोठी अनपेक्षित घडामोड घडली.
advertisement
मनसेचे उमेदवार ठाकरेंच्या निवडणूक चिन्हावर...
अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या मनसैनिकांनी शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मनसेचे 14 उमेदवार आता मशाल चिन्हावर निवडणूक लढणार असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रत्येक पॅनलमध्ये मनसेचा एक उमेदवार आणि ठाकरे गटाचा एक उमेदवार असणार आहे.
अंबरनाथमध्ये काँग्रेसला वगळून आघाडी...
शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असे तीन पक्ष एकत्र आले असून अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षाकरिता अंजली राऊत यांना उमेदवारी दिली आहे. अंजली राऊत यांनी आज उमेदवारी दाखल केला आहे. तर, काँग्रेसने या आघाडीतून बाहेर पडत स्वतंत्र पॅनेल, नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आहेत.
बदलापूरमध्ये तृतीयपंथी रिंगणात...
बदलापूरमध्ये एका तृतीयपंथीयाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रोशनी सोनकांबळे असे त्यांचे नाव असून प्रभाग १० मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपण निवडून आल्यावर कामे केले नाही तर तोंडाला काळं फासा असे आव्हानच त्यांनी दिले आहे.
