मनसेने निवडणुकीपूर्वी आपली मोर्चेबांधणी वेगवान सुरू केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढ झाली. त्यानंतर मराठीच्या मुद्यावर एकत्र आले. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जवळीक दिसून आली.
जागा वाटपाआधी मनसेच्या हालचाली...
आगामी मुंबई महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधीच मनसेकडून आपला ग्राउंडवरील होम वर्क पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. ठाकरे गटासोबतच्या संभाव्य युतीनंतर मनसे आता जागा वाटपाच्या अनुषंगाने तयारी करत आहे. शिवसेना ठाकरे गटासोबत संभाव्य युतीची शक्यता लक्षात घेऊन मनसेने २२७ पैकी १२५ प्रभागांचा सखोल अभ्यास केला आहे. या जागांवर मनसेचे उमेदवार विजयी होण्याची अधिक शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे मनसेकडून या जागांचा आग्रह होण्याची अधिक शक्यता आहे.
advertisement
कोणत्या भागांमध्ये मनसेचा दावा...
माहीम, दादर, परळ, लालबाग, विक्रोळी, भांडुप आणि घाटकोपरसारख्या मराठी मतदारवस्त्यांमध्ये मनसे विशेष रणनीती आखत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसेने सध्या १२५ मजबूत प्रभागांची यादी तयार केली आहे. या सर्व प्रभागांवर सक्षम आणि स्थानिक पातळीवर ओळख असलेल्या उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठाकरे गटाशी युती झाली, तर जागावाटपात या प्रभागांना उच्च प्राधान्य दिले जाणार असल्याची माहितीही समोर येते.
ठाकरे गटासोबत नवा पेच?
मनसेने दावा केलेल्या भागांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. दोन्ही पक्षांचा मोठा मतदार हा मराठी भाषिक आहे. त्यामुळे मराठी भाषिक बहुल भागात दोन्ही पक्षांना यशाची अधिक अपेक्षा आहे. त्यामुळे जागा वाटपात कोणत्या जागांवर कोणाला संधी मिळणार, कोणत्या पक्षाकडे जागा जाणार, याकडे ही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
