काय म्हणाले राज ठाकरे?
निश्चित, अतिशय आनंदाची बाब आहे. या निमित्ताने महाराजांनी रुजवलेला स्वराज्याचा विचार कुठवर पोहचला होता हे महाराष्ट्राचं कर्तृत्व यावर बोलणाऱ्यांना हे कळेल आणि महाराष्ट्र ते थेट दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत दोन भाषांचा आणि संस्कृतींचा सेतुबंध किती जुना आणि मजबूत आहे हे पण कळेल, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी सरकारला इशारा देखील दिला आहे.
advertisement
दोन मोठी उदाहरणं दिली...
फक्त सरकारला एक आठवण करून द्यावीशी वाटते ती म्हणजे युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही. जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं, याची आत्तापर्यंतची दोनच उदाहरणं आहेत पण ती आहेत हे विसरू नका. एक उदाहरण आहे ओमान मधल्या अरेबियन आवरिक्स अभयारण्याचं आणि दुसरं उदाहरण आहे ड्रेस्डन व्हॅलीचं... जर्मनीतील ड्रेस्डन व्हॅलीला जागतिक वारसा दर्जा मिळाला पण निकष न पाळल्याने तो 2009 ला काढून घेतला. यामुळे सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं, असंही राज ठाकरे म्हणाले.
अनधिकृत बांधकामं हटवा - राज ठाकरे
दरम्यान, सर्वप्रथम या सर्व गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ पाडून टाका, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यात जात - धर्म पहाण्याची गरज नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी टोला देखील लगावला आहे. आत्तापर्यंतच्या एकूण एक सरकारांनी गडकिल्ल्यांची जी दुरवस्था करून ठेवली होती त्यामुळे जगाला बोलावून हे किल्ले दाखवावे, आपल्या महाराजांचं, महाराष्ट्राचं वैभव दाखवावं अशी परिस्थिती नव्हती ती आता बदलेल, अशी आशा देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.