नागपूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतही स्वबळाच्या घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहे. तर, दुसरीकडे ठाकरे बंधूंची युती आणि राज यांचा मविआत प्रवेश याकडेही लोकांचे लक्ष लागले आहे. तर, दुसरीकडे राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत आमच्यासोबत आल्याने आमचा पराभव झाल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
advertisement
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे नागपूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रामदास आठवले यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. रामदास आठवले यांनी म्हटले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस हे स्वतंत्रपणे लढतील अशी शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडणार असल्याचे निश्चित आहे.
रामदास आठवले पुढे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे महायुतीसोबत आले, पण त्यातून अपेक्षित फायदा झाला नाही. मात्र, विधानसभेत मनसे युतीत नव्हती तेव्हा आमच्या पक्षाला अधिक जागा मिळाल्या. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी महायुतीसोबतच राहील,” असे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या संदर्भात बोलताना आठवले यांनी स्पष्ट केले की, “राज ठाकरे आले तरी फारसा फायदा होणार नाही. काँग्रेस त्यांच्यासोबत जाणार नाही, ही त्यांची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले.
ठाकरे एकत्र आले तरी परिणाम नाही...
रामदास आठवले यांनी म्हटले की, “नव्या सर्वेनुसार भाजप-शिवसेना (शिंदे गट)-रिपब्लिकन पार्टी महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी आमचा फायदाच होईल. महानगरपालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.