पेण : राज्यात नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीचं मतदान पार पडलं. पण, मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असल्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. स्ट्राँग रूमबाहेर उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आहे. अशातच रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये स्ट्राँग रुममध्ये कुणी तरी कपाटाचा दरवाजा उघडत असल्याचं समोर आलं. त्यामुळे उमेदवारांनी एकच गोंधळ घातला. पण, सीसीटीव्ही व्हिडीओ पाहिला असता सगळ्यांना धक्काच बसला.
advertisement
त्याचं झालं असं की, रायगडच्या पेणमध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. त्यानंतर सगळ्या EVM मशीन या कडक पोलीस बंदोबस्तात स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्यात. आधीच दुबार मतदान आणि EVM वर संशयामुळे कडक असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पण, एवढा कडक बंदोबस्त असून सुद्धा स्ट्राँग रुममध्ये कपाटाचा दरवाजा उघडल्याचा प्रकार समोर आला.
शनिवारी पहाटेच्या सुमारास स्ट्रॉंग रूममध्ये EVM मशिन ज्या कपाटावर ठेवल्या आहेत, त्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडल्याने एकच गोंधळ उडाला होता. EVM ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये कपाटाचा दरवाजा उघडला ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. उमेदवारांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनाा घेराव घातला. पोलिसांनाही नेमकं कुठं चुकलं काही कळायला मार्ग नव्हता. एकीकडे उमेदवारांचा गोंधळ आणि दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त असं असताना स्ट्राँग रुममध्ये कोण घुसलं, असा प्रश्न सगळ्यांना पडला.
जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तेव्हा पोलिसांनी डोक्याला हात लावला. ज्या स्ट्राँग रुममध्ये EVM मशीन ठेवल्या आहेत, त्याच रूममध्ये उंदरांचा वावर होता. एका उंदराने मोठ्या शिताफीने कपाटाचा दरवाजा उघडला आणि आता प्रवेश केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला. जेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाला आणि सगळ्यांनी पाहिला, तेव्हा एकच हश्शा पिकली. उंदराने हा प्रताप केल्याचं लक्षात आल्यावर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि उमेदवारांचा जीव भांड्यात पडला.
