रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या लोटे एमआयडीसी मध्ये प्रदूषणापाठोपाठ आता कंत्राटावरून मोठा राजकीय वाद समोर आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामधील वाद थेट हाणामारीपर्यंत गेला आहे.
लोटे एमआयडीसी ही रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मध्ये येते आणि हाच खेडचा भाग गुहागर विधानसभा मतदारसंघात येतो. या गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे आहेत. तर, त्यांचा मुलगा विक्रांत भास्कर जाधव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख आहेत. 6 नोव्हेंबर 2025 रोजी विजय केमिकल्स या कंपनीमधील कंत्राटावरून शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख यांनी या कंपनीतील विक्रांत जाधव यांचे कंत्राट असलेले काम बंद करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली.
advertisement
जोरदार वादावादी अन् कानशिलात लगावली...
स्थानिकांना प्राधान्य मिळाले पाहिजे या मागणीतून त्यांनी हा प्रयत्न केला यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि स्थानिक आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव थेट कंपनीत जाऊन शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना जाब विचारला यावरून वाद निर्माण झाला आणि विक्रांत जाधव यांचा संयम तुटला त्यांनी सचिन काते यांच्या थेट कानशिलात लगावली. जाधव यांच्या कामगारांना काम करण्यापासून काते यांनी रोखल्यावरून वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी सचिन काते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विक्रांत जाधव यांसह तिघा जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता या नव्या वादाची ठिणगी लोटे एमआयडीसीत पडल्याचे पाहायला मिळते.
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत. तर महसूल व गृहराज्यमंत्री योगेश कदम हे देखील खेडमधीलच आहेत. एवढेच नाही तर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम हे देखील खेडमधीलच आहेत त्यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले सचिन काते यांनी लोटे एमआयडीसीतील कंत्राटावरून थेट भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांचे काम बंद पडल्याने व विक्रांत जाधव यांनी त्यांच्या कानशिलात लगावल्याने मोठ्या वादाची ठिणगी पडली आहे.
