कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये भाजप विरुद्ध शिंदे गट अशी लढत होणार असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूने इनकमिंग जोरात सुरू केले आहे. मात्र, अशातच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे दिवंगत नेते व माजी स्थायी समिती अध्यक्ष वामन म्हात्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे यांनी पत्नी अश्विनी म्हात्रेसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशाने स्थानिक राजकारणात खळबळ माजली आहे.
advertisement
भाजपमध्ये प्रवेश करताना अनमोल म्हात्रे यांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास दाखवत आगामी निवडणुकांमध्ये विजयासाठी काम करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेना-शिंदे गटाच्या गोटात नाराजीचे सूर उमटल्याचे बोलले जात आहे. विशेषतः कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ही मोठी राजकीय धक्का मानला जात आहे. शिवसेना शिंदे गटाला या पक्ष प्रवेशामुळे बॅकफूटवर जावं लागल्याची चर्चा आहे.
अनमोल म्हात्रे हे शिवसेनेचे ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेते दिवंगत वामन म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत. वामन म्हात्रे यांनी पाच वेळा नगरसेवक आणि चार वेळा स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम केले आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये त्यांना मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश हा आगामी निवडणुकीत समीकरणे बदलणारा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
