भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हेदेखील डोंबिवलीचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी कल्याण-डोंबिवलीची निवडणूक महत्त्वाची आहे. आपल्या होमग्राउंडवर भाजपच्या एकतर्फी विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी रविंद्र चव्हाण उत्सुक असून त्यांनी आक्रमक डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. आज रविंद्र चव्हाण यांनी शिंदे गटाला जोरदार धक्का दिला. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निकटवर्तीय माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश झाला.
advertisement
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी होमग्राउंड असलेल्या कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटावर सर्जिकल स्ट्राइक केला आहे. शिंदे कुटुंबीयांचे निकटवर्तीय फोडले असून भाजपात त्यांनी प्रवेश केला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.
ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये भाजप विरुद्ध शिंदे गट अशी लढत होणार असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूने इनकमिंग जोरात सुरू केले आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते व माजी स्थायी समिती अध्यक्ष वामन म्हात्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे यांनी पत्नी अश्विनी म्हात्रेसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. वामन म्हात्रे यांनी पाच वेळा नगरसेवक आणि चार वेळा स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम केले आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये त्यांना मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश हा महत्त्वाचा आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी ही मोठी राजकीय धक्का मानला जात आहे.
दोन तासांत शिवसेना शिंदे गटाला दुसरा धक्का..
माजी नगरसेविका सुनीता पाटील, माजी नगरसेवक महेश पाटील माजी नगरसेविका सायली विचारे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. महेश पाटील हे कल्याण ग्रामीण शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख आहेत. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला. या त्याशिवाय, माजी परिवहन समिती सदस्य संजय राणे यांनीदेखील आज भाजपात प्रवेश केला.
