कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा मंदिरामध्ये पुजारी आणि भाविकांमधील वाद आता चांगलाच चिघळला आहे. पुजाऱ्यांनी भाविकांना अमानुष मारहाण केली होती. त्यानंतर आता यात्रेच्या तोंडावरच हा वाद उफाळल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. 'पुजारी हटवा, पगारी पुजारी नेमा' अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
जोतिबा मंदिर असलेल्या परिते गावच्या ग्रामस्थांनी आज सोमवारी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य आणि लक्षवेधी मोर्चा काढत आपल्या भावना तीव्र स्वरूपात व्यक्त केल्या. १ एप्रिल रोजी होणाऱ्या जोतिबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. पंचक्रोशीतून हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ, तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर या आंदोलनात सहभागी झाले होते. “पुजारी हटवा… पगारी पुजारी नेमा…”, “भाविकांवर अन्याय बंद करा…” अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
advertisement
वादाचे नेमकं कारण काय?
परिते गावचे काही भाविक धार्मिक कारणासाठी जोतिबा मंदिरावर गेले होते. तेथील काही पुजाऱ्यांनी त्यांच्याशी वाद घालत मारहाण केली. हा प्रकार इथंच थांबला नाही तर पुजाऱ्यांनी डोक्यात नारळ सुद्धा मारण्यात आलं होतं. या घटनेमुळे पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली होती.
दरम्यान, या प्रकरणात पुजाऱ्यांकडून ग्रामस्थांवर दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, हा आरोप ग्रामस्थांनी ठामपणे फेटाळून लावत, “आम्ही धार्मिक कारणासाठी गेलो होतो, आम्ही कुठलाही गोंधळ घातलेला नाही,” असा दावा केला. उलट, पुजाऱ्यांकडूनच गैरवर्तन आणि मारहाण झाल्याचे त्यांनी सांगितलं.
पुजाऱ्यांवर कारवाई करा
मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. संबंधित पुजाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, तसंच मंदिरातील पुजाऱ्यांची मनमानी थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच पारंपरिक पद्धतीत बदल करत पगारी पुजारी नेमणुकीची मागणीही जोर धरू लागली आहे.
जोतिबा मंदिर हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक असून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः चैत्र महिन्यात होणारी यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या यात्रेच्या तोंडावर निर्माण झालेला वाद अधिक संवेदनशील ठरत आहे.
यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना परिते ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा आणि पुजाऱ्यांवर होणारे गंभीर आरोप यामुळे हे प्रकरण अधिकच तापले आहे. आता प्रशासन यावर नेमका काय तोडगा काढते, आणि यात्रेपूर्वी परिस्थिती नियंत्रणात आणते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
