ही घटना सांगलीच्या ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अमानुष अत्याचाराची ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे (दोघे रा. खांबे मळा, कामेरी रस्ता, ईश्वरपूर) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या दोघांविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंद केला आहे. मंगळवारी रात्री ९च्या सुमारास ही घटना घडली.
advertisement
ज्यावेळी हा सगळा प्रकार घडला, त्यावेळी पीडितेच्या आई ड्युटीवर होती. कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना आपली मुलगी कुठेच दिसली नाही. सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर त्यांनी तातडीने ईश्वरनगर पोलीस स्टेशन गाठलं. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. काही वेळात पोलीस पीडित मुलीस घेऊन आले. आईने मुलीकडे विचारपूस केल्यावर या अमानुष घटनेचा उलगडा झाला.
दोन्ही आरोपींनी पीडित मुलीवर गावाजवळील एका शेतात नेत आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला होता. अत्याचारानंतर आरोपी पीडितेचे कपडे घेऊन पळून गेले. यामुळे पीडित मुलगी ही जवळपास १ किलोमीटर अंतर रात्रीच्या अंधारात विवस्त्र अवस्थेत चालत आली होती. शहरालगत असलेल्या एका चौकात आल्यावर काही नागरिकांनी तिला पाहिलं. तिच्यासोबत काहीतरी चुकीचं घडल्याचं समजल्यानंतर नागरिकांनी तातडीने तिला कपडे दिले. तसेच घटनेची माहिती पोलिसांना दिली.
