शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या आभार समारंभ सभेला रोहित पवार यांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांनी महायुतीवर टीका केली. विधानसभेमध्ये बहुमत मिळूनही राज्य सरकार सरकार स्थापन करत नाही. या महायुतीमध्येच त्यांचे वाद सुरू असल्याचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले.
या महायुतीमधील वाद म्हणजे, मुलाने मुलीला पसंत केलं, लग्न ठरलं...वऱ्हाडी आले. त्यानंतर लग्न मंडपात नवरा नवरी आले आणि अचानक नवरदेव म्हणतोय मला हुंडा पाहिजे. या महायुतीत आता मुख्यमंत्री पदावरुन त्यांचे भांडण सुरू असल्याची टीका आमदार रोहित पवारांनी केली आहे.
advertisement
महायुतीमधील तिढा कायम...
राज्यात निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्याच्या एक आठवड्यानंतरही सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला नाही. भाजपकडून अद्यापही आपल्या विधीमंडळ गटनेत्याची निवड झाली नाही. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटासोबत खाते वाटपाचा तिढा कायम आहे. सत्ता वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी, सायंकाळी 5 वाजता आझाद मैदान येथे पार पडणार असल्याचे जाहीर केले.
