आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतील पेट्रोल विक्रीवर होणार आणि पेट्रोल महागणार अशी अफवा सोशल मीडियावर पसरली, त्यानंतर नांदेडमध्ये मंगळवारी रात्री पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी अचानक एकच गर्दी केली. शहारातील सर्वच पेट्रोल पंपांवर वाहन धारकांची गर्दी झाली. जिकडे तिकडे पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी रांगाच रांगा लागल्या.
होळीमुळे पेट्रोल पंप बंद आणि अफवा पिकली
advertisement
आज होळीमुळे संध्याकाळपर्यंत काही पेट्रोल पंप बंद होते. त्यामुळे अफवेला बळ मिळालं आणि बघता बघता पेट्रोल पंपावर एकच गर्दी उसळली. तीन दिवस पेट्रोल पंप बंद राहणार अशी देखील अफवा पसरली. त्यामुळे पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागल्या. आता तीन दिवस पेट्रोल मिळणार नाही या अफवेमुळे अनेकांनी टँक फुल देखील केले होते.
मुबलक पेट्रोल साठा उपलब्ध
दरम्यान, मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर जिकडे तिकडे गर्दी झाल्यामुळे खळबळ उडाली. अखेरीस, 'पेट्रोल पंप बंद होणार नाही, मोठा साठा उपलब्ध असल्याची माहिती पेट्रोल पंप चालकाने दिली. शिवाय केंद्र शासन किंवा प्रशासनाकडून पेट्रोल महागणार किंवा पुरवठा कमी होणार अशी कुठलीच अधिकृत माहिती देण्यात आली नाही, असंही सांगण्यात आलं. त्यामुळे निव्वळ अफवेमुळे नागरिकांनी सगळीकडे पेट्रोल पंपांवर गर्दी केली.
