महिलांच्या लैंगिक शोषण, जादूटोणा, आर्थिक फसवणूक, दमदाटी आणि धमकी आदी प्रकरणांत अशोक खरात याच्या नावे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात पोलिसांत तक्रारी दाखल आहेत. अशोक खरात याला एका प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेली असली तरी दुसऱ्या प्रकरणात मात्र तो पोलीस कोठडीत आहे. गेल्या १३ दिवसांपासून विशेष पोलीस पथक त्याची कसून चौकशी करीत आहे. महिला अत्याचार, त्याची गुन्हा करण्याची पद्धती, राजकारण्यांशी त्याचे असलेले संबंध, श्रद्धेच्या नावाखाली लोकांकडून उकळलेले पैसे, दहशतीतून लोकांकडून बळकावलेल्या जमिनी आदी मुद्द्यांशी संबंधित विशेष पोलीस पथक खरातची चौकशी करीत आहे. यादरम्यान पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
advertisement
रुपाली चाकणकर यांची सख्खी बहीण अडकली
भोंदू अशोक खरात याने अनेकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन अनेक कारनामे केले आहेत. जगदंबा पतसंस्था आणि समता पतसंस्थेत अशोक खरात हा शेकडो खात्यांचा नॉमिनी (वारसदार) आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावानेही खाते उघडण्यात आले होते.
प्रतिभा चाकणकर यांच्या खात्यातून ४० ते ५० कोटींचा व्यवहार
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आतापर्यंत भोंदूबाबा खरात याच्याशी कोणतेही आर्थिक व्यवहार केले नसल्याचे सांगितले होते. तसेच त्याच्या व्यक्तिगत आयुष्यासंबंधी आपल्याला काहीही माहीत नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र ज्या पतसंस्थेतून अशोक खरात याने कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला, त्याच पतसंस्थेत रुपाली चाकणकर यांची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकर यांचे बँक खाते असल्याचे समोर आले आहे. प्रतिभा गणेश चाकणकर यांच्या नावाने असलेल्या खात्यातून ४० ते ५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.
जगदंब आणि समता पतसंस्था कुणाची? खरातने १०० कोटीचे व्यवहार खरातने केले
अशोक खरात याचा व्यावसायिक भागीदार नामकर्ण आवारे याच्या मालकीची जगदंब पतसंस्था आहे. तर समता ही पतसंस्था अहिल्यानगरमधील आहे. या दोन पतसंस्थांमधून खरात व्यवहार करीत असे. १०० कोटीहून अधिक रुपयांचे व्यवहार स्वतः खरातने केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे अशोक खरात स्वतःच सगळे व्यवहार हाताळत होता. इतकेच काय तर खरात याचाचा मोबाईल नंबर सगळ्या खात्यांना लिंक होता. दोन्ही पतसंस्थेचे चेअरमन आणि मॅनेजर यांची विशेष पोलीस पथकाकडून चौकशी सुरू आहे.
दरम्यान या सगळ्याशी संबंधी आम्ही प्रतिभा चाकणकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
प्रतिभा चाकणकर कोण आहेत?
प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकर यांच्या सख्ख्या भगिनी आहेत
शिवाय रुपाली चाकणकर यांच्या सख्ख्या जाऊबाई देखील आहेत
रुपाली चाकणकर राजकारणात असल्याने कौटुंबिक जबाबदारी प्रतिभा चाकणकर यांच्यावर आहे
सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो
