मुंबई : सचिन वाझेने पुन्हा एकदा लेटर बॉम्ब टाकत जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भारतातील सगळ्यात मोठ्या अवैध हुक्का वितरकाला सोडून देण्यासाठी जयंत पाटील यांनी आपल्याला फोन केला होता. या फोनची रेकॉर्डिंगही आपल्याकडे असल्याचा दावा सचिन वाझेने केला आहे. मुख्य आरोपीला सोडून देऊन कोणाला तरी अटक दाखवा, असे आदेश जयंत पाटील यांनी दिले होते, असा आरोप सचिन वाझेने केला आहे.
advertisement
याशिवाय सचिन वाझेने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झालं आहे. ठाणे जेलमधून सचिन वाझेने हे पत्र लिहिलं आहे. अनिल देशमुख करत असलेले आरोप चुकीचे आहेत. अनिल देशमुख गृहमंत्री असताना पीएमार्फत पैसे घेतले होते, असा दावा सचिन वाझेने केला आहे.
ठाणे पोलीस निरिक्षक विजय देशमुख यांना लिहिलेलं पत्र सचिन वाझेच्या पत्रासोबत व्हायरल झालं आहे. पोलीस निरिक्षक विजय देशमुख यांच्या बदलीकरता 25 लाख रुपये घेतले होते. सुखदा या निवासस्थानी 25 लाख रुपये घेतले होते, असा आरोप आहे. पैसे परत न केल्यास आमरण उपोषण करण्याचं पत्र विजय देशमुख यांनी दिलं होतं. या पत्रात पुन्हा एकदा शरद पवार, अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांचा उल्लेख आहे. अनिल देशमुखांच्या प्रेशरखाली येऊन अनेक अवैध काम केली, असा दावा सचिन वाझेने या पत्रात केला आहे.
अनिल देशमुख यांच्यावरही आरोप
याआधी सचिन वाझेने अनिल देशमुख यांच्यावरही आरोप केले होते. अनिल देशमुख हे पैसे घेत होते असा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. अनिल देशमुख हे आपल्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा सचिन वाझेने केला आहे. सीबीआयकडे सर्व पुरावे आहेत. फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली असंही सचिन वाझेने म्हटलं आहे.