११ जणांच्या टोळक्याने माजी सरपंचासह त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दादा पठाण यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत दादा पठाण यांच्या घरातील अन्य तिघे देखील गंभीर जखमी आहेत. ही थरारक घटना बुधवारी दुपारी घडली असून या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतर दहा आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ओहर गावातील गट क्रमांक १९८ मधील साडेचार एकर जमिनीच्या मालकी हक्कावरून दोन कुटुंबांत २०२२ पासून वाद आहे. मृत दादा पठाण यांच्याकडे या जमिनीचा कायदेशीर ताबा असून मृत दादा पठाण महसूल दप्तरी तशा नोंदीही आहेत. असे असतानाही, बुधवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास आरोपींनी पठाण कुटुंबाशी वाद उकरून काढला आणि लोखंडीने रॉडने कुटुंबावर हल्ला केला. हा हल्ला इतका भयंकर होता की, यात गावचे माजी सरपंच दादा सांडू पठाण (६९) यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा माजेद, जुनैद आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाले.
या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली असून मृत कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी आरोपींच्या दुकानांची तोडफोड केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच हर्सूल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला.
लोखंडी रॉड, शस्त्रांनी आजोबांची हत्या केली
या घटनेची माहिती देताना मयताचा नातू मोईन पठाण याने सांगितलं की, मी माझ्या आजोबांच्या घरी आलो होतो. अचानक दुपारी साडेबाराच्या सुमारास आम्ही घरी असताना आरोपी दुचाकींवर आले. त्यांच्या हातात लोखंडी रॉड व शस्त्रे होती. त्यांनी थेट मारहाण सुरू केली. काही कळायच्या आत आरोपींनी आजोबांची हत्या केली.
