संभाजीराजे छत्रपतींनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर 'न्यूज 18 लोकमत'शी संवाद साधला. संभाजीराजे यांनी सांगितले की, "वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्याची वेळ आली आहे. यास कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. ही वास्तू जितक्या लवकर काढली जाईल तितकं योग्य होईल, असेही त्यांनी म्हटले.
होळकर महाराजांचा निधी समाधीसाठी...
रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष असलेले संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले की, तुकोजी होळकर महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी निधी दिला होता. हा निधी कुत्र्याच्या पुतळ्यासाठी नव्हता असेही त्यांनी स्पष्ट केले. वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्यासाठी 2036 पर्यंत वेळ आहे. त्याआधी हा पुतळा न हटवल्यास ती संरक्षित वास्तू ठरेल. हा विषय राजकारणाच्या पलीकडचा आहे. सरकारने यासाठी एक समिती स्थापन करावी अशी मागणी त्यांनी केली. 'वाघ्या' बाबतसर्व पक्ष, इतिहासतज्ज्ञ आणि संबंधितांना बोलवून यावर निर्णय घ्यावा असेही त्यांनी म्हटले. आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही, पण महाराजांच्या समाधीशेजारी अशा वास्तू मान्य नाही असेही त्यांनी म्हटले.
advertisement
आता शपथ घेऊन सांगतो...
वाघ्या कुत्र्याचा पुतळा हे ऐतिहासिक संदर्भाशिवाय उभं राहिलेलं अतिक्रमण असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी मत व्यक्त केले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्मारका शेजारी उभा आहे आणि त्यांची शपथ घेऊन सांगतो याला कुठलाही पुरावा नाही असे संभाजीराजे यांनी म्हटले. याच स्मारकाच्या शेजारी आपण दूसरी वास्तू कशी काय खपवून घेऊ शकतो? असा सवालही करत वाघ्याचा पुतळा काढण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले.