सांगली - सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचनी गेल्या 5 वर्षांपासून वेळोवेळी मध्य रेल्वे प्रशासन, रेल्वेमंत्री, रेल्वे बोर्ड आदींकडे पत्रव्यवहार, पुणे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना भेटून सांगलीत प्रत्येक गाडीला थांबा देण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे उन्हाळी, दिवाळी, दसरा, होळी अशा सर्व विशेष गाड्यांना सांगलीत थांबा देण्यासाठी मागणी केली होती. वेळोवेळी आंदोलनाचा इशाराही दिला होता. याच मागणीवर विचार करून दक्षिण पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने ऑक्टोबर महिन्यात बंगळुरू-जोधपूर व जोधपूर-बंगळुरू या 2 विशेष वातानुकूलित एक्स्प्रेस गाड्यांना सांगलीत थांबा दिला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
advertisement
अशी असेल जोधपूर -बंगळुरू विशेष रेल्वे -
आठवड्यातून 2 दिवस जाण्यासाठी व 2 दिवस परतीसाठी थांबा मिळाला आहे. जोधपूर-बंगळुरू (क्र. 06558) ही गाडी 28 ऑक्टोबर व 2 नोव्हेंबर रोजी जोधपूर येथून पहाटे 5 वाजता निघणार आहे. सांगलीत दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 ऑक्टोबर व 3 नोव्हेंबरला सकाळी 7: 23 ला येणार असून पुढे ती मिरज, घटप्रभा, बेळगावी, लोंडा, धारवाड, हुबळी, हावेरी, हरीहर, दावणगेरे, बिरुर, अरसीकेरे, तुमकूर, बनसवाडी व बंगळुरू अशी धावेल.
अशी असेल बंगळुरू-जोधपूर विशेष रेल्वे -
बंगळुरू-जोधपूर (क्र. 06587) ही गाडी बंगळुरू येथून 25 आणि 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:25 ला सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी 26 व 31 ऑक्टोबरला सकाळी 9:05 वाजता सांगलीत येणार आहे . ही गाडी पुढे सातारा, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सूरत, वडोदरा, अहमदाबाद, महेसाना, पालनपूर, आबूरोड, पिंडवाडा, जवाईबांध, फालना, मारवाड, पाली मारवाड, लुनी आणि भरत की कोठी अशी धावणार आहे. या गाडीमध्ये 4 सेकंड एसी, 15 थर्ड एसी, दोन पॉवरकारसह 21 बोगी असणार आहेत.
"प्रवाशांनी 'आयआरसीटीसी' या वेबसाईट वरून ऑनलाईन तिकिटे काढावीत. सांगली स्थानकावरूनही लवकरात लवकर तिकिटांचे बुकिंग करावे. सणांच्या काळात गाडी फुल्ल होण्याची शक्यता आहे. जाताना बोर्डिंग सांगली व परतीच्या प्रवासात शेवटचा थांबा सांगली टाकावा," असे नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर म्हणाले.
दिवाळीच्या सुट्टीत नेहमी विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात येते. यंदाही दिवाळी सुटीच्या निमित्ताने सुरू केलेल्या विशेष रेल्वेला सांगलीत थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये जोधपूर-बंगळुरू व बंगळुरू-जोधपूर या दोन दिवाळी विशेष रेल्वे गाड्यांना सांगलीमध्ये थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.