शिवसेना आमदार तथा राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करताना शिंदेंच्या काँग्रेस प्रवेशाचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. त्याउलट संजय राऊत यांचाच उद्धव ठाकरेंना पक्षातून बाहेर काढण्याचा डाव होता, असा सनसनाटी आरोप केला.
उद्धव ठाकरेंना पक्षातून बाहेर काढण्याचा डाव, संजय राऊतांचा प्लॅन- शिरसाट
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या जवळच्या लोकांचा एकनाथ शिंदे यांच्यावर पहिल्यापासून रोष होता. ही सगळी मंडळी एकनाथ शिंदे यांचा कमालीचा द्वेष करायचे. आम्ही केलेल्या उठावाचे महत्त्व संजय राऊत यांना कळत नाही. पण हे तेच संजय राऊत आहेत, ज्यांनी उद्धव ठाकरे यांना पक्षातून बाहेर काढण्याचा डाव आखला होता.
advertisement
संजय राऊत यांनी आमदारांचा ग्रुप करायला लावला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव निर्माण करता येईल. उद्धव ठाकरे यांना तब्येतीचे कारण देऊन बाजूला करायचे असे प्लॅनिंग संजय राऊत यांनी केले होते, असे सनसनाटी दावे संजय शिरसाट यांनी केले.
संजय राऊत उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत बोलतो, त्याने पक्षाचे वाटोळे केले
उद्धव ठाकरे यांनी २०१९ साली स्पष्ट केले होते की भाजपवाल्यांचा फोन घेणार नाही, बोलणार नाही. त्याआधीच त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जमवून घेतले होते. संजय राऊत यांनी शिवसेना पूर्णत: संपवली. संजय राऊत उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत बोलतो. त्यानेच संपूर्ण पक्षाचे वाटोळे केले, अशी टीका राऊत यांनी केली.
संजय शिरसाट यांचे संजय राऊत यांना आव्हान
मी केवळ टीका करतोय असे नाही, वेळ आली तर मी केलेले आरोप आमने सामने सिद्ध करेन, असे आव्हानही शिरसाट यांनी संजय राऊत यांना दिले.
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते-संजय राऊत
एकनाथ शिंदे यांचे भगव्याशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना भगव्याशी काही इमान नाही. त्यांच्या हातात भाजपचा झेंडा आहे. एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. अहमद पटेल आज हयात नाही. नाहीतर पहाटेच्या चर्चा त्यांनीच सांगितल्या असत्या, असा दावा संजय राऊत यांनी केला.
