गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेल चर्चेचा विषय ठरलाय. काही दिवसांपूर्वी या हॉटेलची लिलाव प्रक्रिया पार पडली होती. त्यात संजय शिरसाट यांच्या मुलाने सहभाग घेतला होता. 110 कोटींचं हे हॉटेल शिरसाटांच्या मुलानं 67 कोटीत घेतल्याचा आरोप करत विरोधकांनी आरोपांची राळ उडवून दिली. त्यावर शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं. 67 कोटी ही रक्कम सांगितली गेली, ती कोर्टानेच सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या लिलावातून माघार घेत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
advertisement
संजय शिरसाट यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून? असा सवाल विरोधकांनी केला होता. त्यावर बँका लोन देण्यासाठी माझ्या दारात येतात असे शिरसाट म्हणाले. तर हा राजकीय बनाव असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.
हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेवरुन विरोधकांनी शिरसाटांना घेरलेलं असतानाच शिरसाटांच्या मुंबईतल्या घरावरुनही विरोधकांना निशाणा साधला. त्यावर राजकारण करताना समोरासमोर करा. कुटुंबाचा वापर करून कुणीही आरोप करू नये. माझ्या नादी लागाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा शिरसाट यांनी दिला.
संजय शिरसाट यांचं आतापर्यंतचं जे काही काम आहे, त्याशिवाय ते मुंबईत ७२व्या माळ्यावर राहायला गेले का? ते शिवसेनेमुळेच गेले ना. मुंबईतील ७२ व्या माळ्यावर आम्ही देखील राहत नाही. ग्रामीण भागातील एक तरुण ७२ व्या माळ्यावर राहतो, ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची कृपा आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. असेही संजय राऊतांनी म्हटले. “कोण शिरसाट सोडून द्या, असे खूप येतात आणि जातात,” अशी टीका राऊत यांनी केली. एकूणच एका हॉटेलच्या लिलावापासून सुरु झालेला हा वाद एकमेकांच्या घरापर्यंत येऊन ठेपलेला पाहायला मिळालाय.
