सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा गोंधळ उडाला आहे. प्रभाग क्रमांक 3-ब हा महिला राखीव (सामान्य) म्हणून घोषित असतानाही या जागेसाठी एका पुरुष उमेदवाराचा अर्ज वैध ठरल्याचे अधिकृत यादीत दिसून आले आहे. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अंतिम यादीत जाधव जयसिंग सुभाष हा पुरुष उमेदवार पात्र ठरल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. ही यादी समोर आल्यानंतर ती सोशल मीडियावर व्हायरल झाली असून साताऱ्यात प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
महिला राखीव जागा म्हणजे त्या जागेसाठी फक्त महिलांनाच उमेदवारीची परवानगी असते. हा स्पष्ट नियम असतानाही पुरुष उमेदवाराचा अर्ज कसा काय स्वीकृत झाला, यावर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. एकूण सात उमेदवारांची यादी जाहीर झाली असून त्यापैकी सहा महिला असताना एक पुरुष उमेदवार राखीव जागेत असल्याने निवडणूक प्रक्रियेतील निष्काळजीपणावर बोट ठेवले जात आहे. ही तांत्रिक चूक, प्रशासनातील हलगर्जीपणा, की काही वेगळा दबाव? याबाबतच्या चर्चा आता शहरभर रंगत आहेत.
या घटनेनंतर नागरिक, स्थानिक नेते आणि विविध सामाजिक संघटनांनी निवडणूक व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महिला राखीव जागेचा हेतू महिलांना राजकारणात संधी देणे असताना अशा प्रकारची चूक महिलांच्या अधिकारांवर गदा आणणारी असल्याचा आरोप महिला संघटनांकडून केला जात आहे. काही कार्यकर्त्यांनी या प्रकरणात तक्रार देण्याची तयारीही दाखवली असून, निवडणूक अधिकाऱ्यांनी तात्काळ दुरुस्ती करून योग्य यादी जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या प्रकरणात प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. चूक मान्य केली जाणार की या उमेदवाराला काही विशेष श्रेणीच्या आधारे पात्र ठरवले जाणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे. निवडणुका अगदी जवळ असताना या गोंधळामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
