शिवेंद्रसिंहराजे आणि जयकुमार गोरे यांची रणनीती यशस्वी
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने साताऱ्यात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रिया महेश शिंदे यांची, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली आहे. भाजपकडे केवळ २७ सदस्य असतानाही त्यांनी बहुमताचा आकडा गाठून विरोधकांना चकित केले.
advertisement
सातारा जिल्हा परिषदेत भाजप हा २७ जागांवर विजयी झाला होता. साताऱ्यात हा मोठा पक्ष ठरला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला २० आणि शिवसेना शिंदे गटाला १५ जागा मिळाल्या. तर, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला प्रत्येकी एक जागा मिळाली असून एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली होती.
एका मतानं कमळ फुललं
आज झालेल्या मतदानात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार प्रिया शिंदे यांना ३३ तर मनीषा फडतरे यांना ३२ मते मिळाली. भाजपच्या प्रिया शिंदे या अवघ्या एका मताने विजयी झाल्या. उपाध्यक्षपदाचे उमेदवार राजू भोसले यांना ३३ मते मिळाली. निवडीच्या वेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे सगळे नेते जिल्हा परिषदेत दाखल झाले होते.
अदृश्य हातांची मदत आणि फोडाफोडीची चर्चा
हा विजय भाजपसाठी जेवढा आनंददायी आहे, तेवढाच तो राष्ट्रवादीचे नेते, मंत्री मकरंद पाटील आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांना मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटातून काही सदस्यांची मते फुटल्यामुळे भाजपचा मार्ग सुकर झाला. मतदानाच्या आधी सदस्यांची पळवापळवी झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. ऐनवेळी समीकरणे बदलल्याने शिंदे गट-राष्ट्रवादीच्या रणनीतीचा पुरता फज्जा उडाला असून साताऱ्यात पुन्हा एकदा 'कमळ' फुलले आहे.
