नेमकं काय बोलले उदयनराजे?
यावेळी उपस्थितांसमोर भाषण करताना उदयनराजे भोसले काहीशे गोंधळले होते. त्यांनी भाषणादरम्यान वाघनखांवर भाष्य केलं. "छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांच्या सहाय्याने औरंगजेबाचा सामना केला," असं उदयनराजे म्हणाले, नंतर उदयनराजेंनी तात्काळ आपली चूक सुधारत अफजलखान असा उल्लेख केला.
advertisement
अशी आली वाघनखे:
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे साताऱ्यात पोलीस बंदोबस्तात दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील पराक्रमाची निशाणी असणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी सातारा शहरात दाखल झाली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयात ही वाखनखे ठेवण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमध्ये असलेली ही वाघनखे बुधवारी सकाळी विशेष विमानाने महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत दाखल झाली. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर कडेकोट पोलिस बंदोबस्तात या वाघनखांचा स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या साताऱ्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. एका टेम्पोतून ही वाघनखे साताऱ्यातील वस्तु संग्रहालयात सुरक्षित आणण्यात आली.
या वाघनखांसह ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाघनखांवरून रंगलं होतं राजकारण:
दरम्यान वाघनखं राज्यात येण्या अगोदर वाघनखांवरून राजकारण चांगलंच रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं. कोल्हापूरचे इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी ही वाघनखं शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी वापरली नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर विरोधकांनी सरकार शिवभक्तांची दिशाभूल करत आहे, असा आरोप केला होता.
